‘चोसाका’ भाडेतत्त्वावर; प्रस्ताव लवकरच मंत्रालयात

सुनील पाटील  
Tuesday, 24 November 2020

‘चोसाका’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संजीवनी कारखाना, द्वारकाधीश कारखाना, अहमदाबाद येथील कारखाना उत्पादकांनी पाहणी केली आहे.

चोपडा : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहयोगी अथवा भागीदारी किंवा भाडेतत्त्वावर चालविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सोमवारी (ता.२३) दुपारी अडीचला साखर आयुक्तांसोबत पुणे येथे बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘चोसाका’चे अध्यक्ष अतुल ठाकरे यांच्याकडून ‘चोसाका’ची परिस्थिती, ऊसलागवड, कामगारांचे देणे, शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट, बुलडाणा बँक कर्ज आदी विषयांवर सकारात्मक चर्चा केली व ‘चोसाका’ सहयोगी अथवा भाडेतत्त्वावर चालविण्यासंदर्भातचा प्रस्ताव सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती दिली. 

आवश्य वाचा- वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कलेक्टर-एसपींचा ‘मास्टर प्लॅन’ -

बैठकीस पुणे साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे सहसंचालक (साखर) राजेश सुरवसे, औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक (साखर) ठाकूर-रावळ, पुणे मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे एस. सी. नातू, ‘चोसाका’चे अध्यक्ष अतुल ठाकरे, ‘चोसाका’चे संचालक नीलेश पाटील आदी उपस्थित होते. 

चोपडा सहकारी साखर कारखाना सहयोगी, भागीदारी, भाडेतत्त्वावर चालविण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बैठकीत चोसाकाच्या सद्य:स्थितीबाबत सर्व माहिती जाणून घेतली. यात बुलडाणा बँकेचे कर्ज किती? कामगारांचे देणे, शेतकऱ्यांचे ऊस थकीत पेमेंट, याविषयी माहिती जाणून घेतली. ‘चोसाका’ कार्यक्षेत्रात ऊसलागवड किती प्रमाणात आहे? यावर तालुक्यात ऊसलागवडीसाठी क्षेत्र तीन ते साडेतीन हजार हेक्टर लागवडीची अपेक्षा असून, दीड ते दोन हजार हेक्टरवर लागवड झाली असून, पुढील वर्षी तीन ते साडेतीन लाख टन उसाचे गाळप होणार असल्याची माहिती अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. तसेच बुलडाणा बँकेने ‘चोसाका’ भाडेतत्त्वावर देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून, त्यांनी संमती दिली आहे. ‘चोसाका’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संजीवनी कारखाना, द्वारकाधीश कारखाना, अहमदाबाद येथील कारखाना उत्पादकांनी पाहणी केली आहे. कामगारांनी व शेतकऱ्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. 

 
लवकरच प्रस्ताव सादर 
‘चोसाका’ची सद्य:स्थिती जाणून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अजून एक बैठक घेऊन ‘चोसाका’ भाडेतत्त्वावर देण्याबाबत लवकरच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व मंत्रालयात प्रस्ताव सादर करणार असल्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून, पुढील कार्यवाही लवकरच होणार असल्याची माहिती दिली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda proposal to lease the chosaka sugar factory will be sent to the ministry