
केळी तर पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. ऐन कापणीवर आलेल्या केळीचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. या अस्मानी संकटाने कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
चोपडा (जळगाव) : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल चार वेळा अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील पश्चिम भागातील २० गावांमधील २२५ हेक्टर क्षेत्रातील ६७६ शेतकऱ्यांचे केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी पीकविम्याची मुदत जुलै महिन्यातच संपल्याने विम्याचा लाभापासून शेकडो शेतकरी वंचित राहणार आहेत.
तालुक्यातील पश्चिम भागातील घोडगाव, वाळकी, शेंदणी, मालखेडा, कुसुंबा, अनवर्दे बुद्रुक, गणपूर, वढोदा, अजंतीसिम, विटनेर, धानोरा, वेळोदेमोहिदे, दगडी, गलंगी, चौगाव, कुरवेल, बिडगाव, मोहरद, इच्छापूर या २० गावांतील ६७६ शेतकऱ्यांचे जवळपास २२४.६१ हेक्टरवरील फक्त केळी या पिकाचे नुकसान झाले असून, केळी तर पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. ऐन कापणीवर आलेल्या केळीचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. या अस्मानी संकटाने कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
पीकविम्याची मुदत वर्षभर हवी
अस्मानी संकटाने पिकांचे नुकसान झाले तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यास विमा कंपनीकडून काही प्रमाणात हेक्टरी लाभ मिळतो. या आशेने शेतकरी विमा रकमेचा भरणा करतो. मात्र, हा काढलेला विम्याचा कालावधी जुलैअखेरपर्यंतच असल्याने जुलैनंतर शेतकऱ्यांचे कोणत्याही पिकांचे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळत नाही. या शासन व विमा कंपनीच्या धोरणामुळे तालुक्यातील शेकडो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शासनाने विमा काढल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाचा विमा काढला जात नाही, तोपर्यंत मागील विम्याची म्हणजे संपूर्ण वर्षभर मुदत असणे गरजेचे आहे. विम्याची मुदत जुलैमध्ये संपते म्हणजे जुलैनंतर कुठलेच नैसर्गिक संकट येऊ शकणार नाही का? तरी विमा कालावधी मुदत वाढवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील नुकसानग्रस्त गावे
तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल चार वेळा आलेल्या वादळी वाऱ्याने २० गावातील शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, ती आकडेवारी अशी…
नुकसानग्रस्त गावे------हेक्टरी क्षेत्र (कंसात शेतकरी संख्या)
घोडगाव-------------२५.३ (७६),
वाळकी--------------१२ (५०)
शेंदणी---------------११ (३५)
मालखेडा-------------१.०५ (९)
कुसुंबा---------------२८ (७८)
अनवर्दे बुदुक----------२४.८२ (५३)
गणपूर-----------------०.६० (२)
वढोदा-----------------१६.२८(८५)
अजंतीसिम--------------१७.४९ (५८)
विटनेर------------------२९ (८४)
धानोरा प्र चो-------------६.६५ (१३)
वेळोदे-------------------६.५८ (२१)
मोहिदे-------------------१६.८५ (३५)
दगडी-------------------१४.३९ (३८)
गलंगी--------------------१.५० (४)
चौगाव--------------------१ (७)
कुरवेल---------------------१.६ (६)
बिडगाव--------------------५.० (९)
मोहरद--------------------- २.७० (९)
इच्छापूर--------------------२.८० (४)
एकूण---------------------२२५ (६७६)
संपादन ः राजेश सोनवणे