आंघोळीसाठी नदीपात्रात दोघे उतरले...अन्‌ वरती आलेच नाही ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

गूळ मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती.

वर्डी (ता. चोपडा) : वर्डी (ता. चोपडा) येथील दोन युवक गूळ नदीपत्रात अंघोळीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. त्यांचा मृतदेह अद्याप हाती आला नसून शोध सुरू आहे. 

वर्डी येथील विवाहित तरुण दिलीप केशव ढिवरे (वय 21) व सिद्धार्थ शिवाजी साळुंखे (वय 28) यांचा गूळ नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गूळ मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. दिलीप ढिवरे, सिद्धार्थ साळुंखे, विनोद कांबळे हे नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. परंतु दिलीप ढिवरे व सिद्धार्थ साळुंखे हे डोहातून बराच वेळ झाला तरी परत आले नाहीत. हा प्रकार विनोद कांबळे याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वर्डी येथील पोलिसपाटील पद्‌माकर नाथ यांना कळविले. नाथ यांनी अडावद पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. चोपडा पोलिस ठाणे व अडावद पोलिस ठाणे यांनी नदीपात्रात शोधमोहीम हाती घेतली. परंतु नदी दुथडी भरून वाहत असल्याने व अंधार असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. गूळ नदीत सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. 

चोपडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार, अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश तांदळे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडून आले नाहीत. पोलिस उपअधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांनी जाऊन सूचना केल्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda two young men deth Drowning in the river

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: