
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पाच दिवसांपासून तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे.
जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या विळख्यात आजचा सलग पाचवा दिवस दिलासा देणारा ठरला. आजही नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. दिवसभरात ६११ नवे रुग्ण आढळून आले असून ८०९ जणांनी कोरोनावर मात केली. तर गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आठवडाभरातील दररोजच्या मृत्यूसंख्येतही काहीशी घट आली.
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पाच दिवसांपासून तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे. आज प्राप्त अहवालानुसार ८०९ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३४ हजार ३७५वर पोचला असून रिकव्हरी रेट वाढून ७६.४२ टक्के झाला आहे. दुसरीकडे नव्या ६११ बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ९८३ झाली आहे. गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा ११२५ एवढा आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांत जळगाव शहरातील ३ रुग्ण असून ४२ वर्षीय तरुणाव्यतिरिक्त अन्य रुग्ण ५० वर्षांवरील आहेत.
जळगावचा आकडा दहा हजारांवर
जळगाव शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात शहरातील व्यापारी संकुलेही खुली करण्यात आली असून त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात दररोज शंभर, दोनशेवर रुग्ण आढळून येत असून आजही त्यात १४४ची भर पडल्याने एकट्या शहरातील रुग्णसंख्या १० हजार ६९वर पोचली आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९५, अमळनेर ३७, चोपडा ५८, पाचोरा १६, भडगाव १५, धरणगाव ३३, यावल १८, एरंडोल २२, जामनेर ३३, रावेर ६, चाळीसगाव २३, पारोळा ६०, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, अन्य जिल्ह्यातील ७.