
दाम्पत्य प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी आहेत, पण त्यांचे ऑनलाइन आधार लिंक न झाल्याने धान्य वाटपात अडचण आली होती, अशी माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.
धरणगाव (जळगाव) : वृद्ध दाम्पत्याला रेशन दुकानावर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वतः वृद्ध दाम्पत्याला धान्य मिळवून देऊन संविधान दिनी सुखद धक्का दिला आहे. प्रशासकीय कामात सर्वसामान्य माणसाची दखल घेत तातडीने प्रश्न सोडविणे सहसा कठीण असते. असा नागरिकांचा समाज आहे. मात्र, अधिकारी संवेदनशील असतील तर कोणतेही काम सहज शक्य होते, याची जाणीव या वृद्ध दाम्पत्याला देखील आज झाली.
शहरातील निराधार वृद्ध दाम्पत्य जगन्नाथ सुपडू बडगुजर (वय ८१) व त्यांची पत्नी देवकाबाई जगन्नाथ बडगुजर (वय ७८) यांना गेल्या दोन, तीन महिन्यांपासून रेशन दुकानावर धान्य मिळत नव्हते. यासाठी बडगुजर दाम्पत्य तहसील कार्यालयात तक्रार करण्यासाठी आले. तहसीलदार देवरे यांनी वृद्ध दाम्पत्याला बसवून आस्थेवाईकपणे चौकशी केली, धीर दिला आणि तातडीने गहू, तांदळाची बॅग तहसील कार्यालयातच उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे या दाम्पत्याला योजनेचे अनुदान नियमित मिळते किंवा नाही, याबाबत विचारणा केली. यामुळे वृद्ध दाम्पत्याला हायसे वाटले. समाजात, प्रशासनात माणुसकी जपणारी माणसे आहेत असा दिलासा देखील मिळाला.
..कायमची सुटली समस्या
हे दाम्पत्य प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी आहेत, पण त्यांचे ऑनलाइन आधार लिंक न झाल्याने धान्य वाटपात अडचण आली होती, अशी माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली. शिवाय, धान्य दुकानदार बंटी ओसवाल यांच्याशी संपर्क साधून नियमित लाभ सुरू केला आहे. पुढील महिन्यापासून नियमित लाभ मिळेल, अशी खात्री तहसीलदार यांनी दिली. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी या दाम्पत्याला घरी सोडण्याची व्यवस्था केली. संविधान दिनी वृद्ध दाम्पत्याला मिळालेल्या वागणुकीचे, न्यायाचे तहसील कार्यालयात चर्चा होत होती. वृद्ध दाम्पत्याने तहसीलदार आणि प्रशासनाचे आभार मानले.
संपादन ः राजेश सोनवणे