पाणी वाया घालवाल तर होणार फौजदारी गुन्हा

दगडू पाटील
Thursday, 17 December 2020

धरणगाव शहरात जवळपास पाच हजार अधिकृत नळ कनेक्शन आहेत तर तेवढेच अनधिकृत कनेक्शन्स आहेत. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण पडतो. त्यासाठी पाणी वितरणास विलंब होतो.

धरणगाव (जळगाव) : शहरातील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात मोहीम राबवून ते तातडीने बंद केले जातील, तसेच नळांना तोट्या बसवणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी जाहीर केले. यासाठी पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे. 
पालिकेचे मुख्याधिकारी पवार यांनी शहरातील पाणीपुरवठाच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व पत्रकार यांची बुधवारी (ता. १६) सकाळी अकराला एकत्रित बैठक घेतली. पालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील १२ दिवस किंवा आणीबाणीच्या काळात १५ ते २० दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जोरदार चर्चा झाली. या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी या संदर्भातील अडचणी, अचानक उद्‌भवणाऱ्या समस्या वस्तुस्थिती मांडण्यात आली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, आर. डी. महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नीलेश चौधरी, कडू महाजन, भाजप गटनेते कैलास माळी, नगरसेवक भागवत चौधरी यांनी आपली मते मांडली. 

अधिकृत तितकेच अनधिकृत
धरणगाव शहरात जवळपास पाच हजार अधिकृत नळ कनेक्शन आहेत तर तेवढेच अनधिकृत कनेक्शन्स आहेत. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण पडतो. त्यासाठी पाणी वितरणास विलंब होतो. अनधिकृत कनेक्शन शोधून काढून ती कायद्याच्या चौकटीत राहून बंद केली तरच अधिकृत नळधारकांना पुरेसे पाणी मिळेल. दिवसाचा कालावधी सुद्धा कमी करता येईल. त्याचप्रमाणे वाया जाणारे पाणी जाऊ नये, म्हणून सर्व नळधारकांना सूचना देऊन प्रत्येकाने तोट्या बसवाव्या. तसेच धावडा येथून येणाऱ्या जलवाहिनीवर जर काही बिघाड झाला तर दुरुस्त होईपर्यंत गावात पाणी येत नाही. अशा काळात पिंपरीकडून येणाऱ्या जलवाहिनीवरून गावात पाणी द्यावे, असा मुद्दाही बैठकीत मांडला. 

दोन महिन्यात अनधिकृत कनेक्‍शनचा शोध
मुख्याधिकारी पवार यांनी येत्या दोन महिन्यांत शहरातील सर्व अनधिकृत कनेक्शन्स शोधून ते बंद करणार असल्याचे तसेच उर्वरित सर्व अधिकृत कनेक्शनला तोट्या बसविणार असल्याचे सांगितले. जे नागरिक अनधिकृत कनेक्शन बंद करणार नाहीत आणि अधिकृत नळांना तोट्या बसविणार नाहीत, अशांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत त्यांनी दिले. 

पाणीप्रश्‍नी भाजपचा मोर्चा 
धरणगाव शहरात १३ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. परंतु या बैठकीला विशिष्ट लोकांना बोलावण्यात आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती. बैठक आटोपल्यानंतर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप माळी यांनी अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी भाजपची बैठक होत असून, त्यात तारीख आणि वेळ ठरविणार असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप माळी यांनी सांगितले 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharangaon palika decission in water supply