विवाह जमविण्याचा नादात फसवणूक करणारी टोळी गजाआड 

दगडू पाटील
Tuesday, 24 November 2020

संशयित महिला औरंगाबादहून दुसरीकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचून मोठ्या शिताफीने तिला अटक केली.

धरणगाव : शहरातील बडगुजर गल्लीत राहणाऱ्या तरुणाला विवाहाचे आमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला गजाआड करण्यात आले. यामध्ये महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील संशयित महिलेला धरणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने औरंगाबाद बसस्थानकावरून फरारी होण्याच्या प्रयत्नात असताना सापळा रचून अटक केली. 

 हेही वाचा- वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कलेक्टर-एसपींचा ‘मास्टर प्लॅन’

 

२२ नोव्हेंबर २०२० ला रवींद्र भगवान बडगुजर (रा. बडगुजर गल्ली, धरणगाव) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विवाहाचे आमिष दाखवून त्यांची दीड लाखांची फसवणूक झाली. याबाबत त्यांनी श्वेता वैजनाथ डुबुकवडे, अर्जुन बाबूराव नन्नवरे, आनंदा अहिरे, तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी फसवणूक केली. या गुन्ह्याची तत्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक जे. एम. हिरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी हवालदार सय्यद करीम सय्यद अहमद व हवालदार विद्या पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या.

औरंगाबाद बस स्थानकावर 

गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित महिला औरंगाबादहून दुसरीकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचून मोठ्या शिताफीने तिला अटक केली. उर्वरित दोघे संशयित धरणगाव तालुक्यातील असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या तिघा आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharangaon police caught the gang cheating in the name of arranging the marriage