एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही : गुलाबराव पाटील

डी. एस. पाटील
Sunday, 29 November 2020

सर्वजण कोरोनाच्या विशिष्ट परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आहोत. कोरोनामुळे अनेक अडचणी असल्या तरी सरकारने कापूस खरेदी सुरू केली आहे.

धरणगाव (जळगाव) : सरकार अडचणीत असूनही कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव येथे शासकीय कापूस खरेदीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. 

धरणगाव येथील कृष्णा कॉटन व एस. के. कॉटन जिंनीग प्रेसिंग मिलमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील अध्यक्षस्थानी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते तथा पणनेचे संचालक संजय पवार, पंचायत सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, आशिष गुजराथी, शेतकी संघाचे अध्यक्ष नवल पाटील, तहसीलदार नितीन कुमार देवरे व शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की आपण सर्वजण कोरोनाच्या विशिष्ट परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आहोत. कोरोनामुळे अनेक अडचणी असल्या तरी सरकारने कापूस खरेदी सुरू केली आहे. धरणगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, व कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. 
दरम्यान, धरणगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आशिष गुजराथी व संजय पवार यांनी आपल्या मनोगतातून शेतकर्‍यांनी कापूस खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharangaon start cotton kharedi center in goverment