esakal | धरणगाव तालुक्यात कोरोना येतोय नियंत्रणात; केवळ १३ रुग्ण  
sakal

बोलून बातमी शोधा

धरणगाव तालुक्यात कोरोना येतोय नियंत्रणात; केवळ १३ रुग्ण   

महसूल, पालिका आणि वैद्यकीय, स्वच्छता विभागाने केलेले नियोजन, नागरिकांनी दिलेली साथ यामुळे तालुक्यात कोरोनावर मात करणे शक्य होत आहे.

धरणगाव तालुक्यात कोरोना येतोय नियंत्रणात; केवळ १३ रुग्ण  

sakal_logo
By
दगडू पाटील

धरणगाव : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असताना तालुक्यात आता केवळ तेरा रुग्ण अॅक्टिव आहेत. स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन यांचे योग्य नियोजन व त्याला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. 

कोरोना रुग्णांची संख्या लवकरच तालुक्यात शून्य होईल, असा कयास प्रशासनाचा आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये आजही कोरोना पसरलेला नाही. धरणगावसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरात झपाट्याने वाढत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महसूल, पालिका आणि वैद्यकीय, स्वच्छता विभागाने केलेले नियोजन, नागरिकांनी दिलेली साथ यामुळे तालुक्यात कोरोनावर मात करणे शक्य होत आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गिरीश बोरसे, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, पोलिस निरीक्षक पवन देसले, गटविकास अधिकारी स्नेहलता कुढचे यांच्यासह प्रशासनाच्या विविध टीमने कोरोनाला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नागरिकांमध्ये जनजागृती केली. कोरोना एकूणच परिस्थितीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील आदी लक्ष ठेवून होते. रुग्णांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनासह नगराध्यक्ष नीलेश चौधरी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ यांचे विशेष कौतुक केले जात आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आव्हानात विविध सामाजिक संस्था, विविध पदाधिकारी, वैद्यकीय सेल, व्यापारी वर्ग यांनी विशेष सहकार्य केले. पालिकेने आणि ग्रामपंचायतीने कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात रस्ते बंद करून उपाययोजना केल्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यात यश आले. धरणगावला गुरुवारचा बाजार अजूनही बंद आहे, हे मोठे यश आहे. 

दृष्टिक्षेपात धरणगाव तालुका 
तालुक्यात १६ मेस पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आजपर्यंत तालुक्यात नऊ हजार १०५ नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या, पैकी सहा हजार ८६५ नागरिकांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. दोन हजार ८४ रुग्ण बाधित होते. पैकी, दोन हजार २२ रुग्ण बरे झालेले आहेत, तर ४९ रुग्ण मृत झालेले आहेत. सध्या १३ रुग्ण उपचार घेत असून, यापैकी १० ग्रामीण भागातील, तर तीन शहरातील आहेत. व्यतिरिक्त १५६ रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. 

या गावात कोरोनाला एन्ट्री नाही... 
तालुक्यातील गोंदेगाव, भामर्डी, कंडारी, निशाणे खुर्द, गांगापुरी, फुलपाट, भोकणी, भौद खुर्द, दोन गाव खुर्द, लाडली या दहा गावांत कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूलच्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे