
कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनात विविध सामाजिक संस्था, विविध पदाधिकारी, वैद्यकीय सेल, व्यापारी वर्ग यांनी विशेष सहकार्य केले.
धरणगाव : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून स्थिर होते. मात्र, बुधवारी तालुका ‘कोरोना’ मुक्त झालेला आहे. महसूल, पालिका, आरोग्य आदी प्रशासनाचे हे यश आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
आवश्य वाचा- आर्थिक गणनेत चुकीची माहिती दिल्यास होणार दंडात्मक कारवाई
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, याचवेळी दुसऱ्या लाटेची भीती देखील नागरिकांना आहे. समाधानाची बाब म्हणजे, तालुक्यात आता एकही रुग्ण ‘अॅक्टिव’ नाही. स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या योग्य नियोजनामुळे कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे.
तालुक्यातल्या काही गावांमध्ये आजही कोरोना पसरलेला नाही. धरणगावसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महसूल, नगरपालिका आणि वैद्यकीय, स्वच्छता विभागाने केलेले नियोजन नागरिकांनी दिलेली साथ यामुळे तालुक्यात कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे.
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गिरीश बोरसे, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, तत्कालीन पोलिस निरीक्षक पवन देसले, जयपाल हिरे, गटविकास अधिकारी स्नेहलता कुढचे यांच्यासह प्रशासनाच्या विविध पथकाने कोरोनाला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नागरिकांमध्ये जनजागृती केली. तालुक्याच्या एकूणच परिस्थितीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील आदी लक्ष ठेवून होते रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासनासह नगराध्यक्ष चौधरी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ यांचे विशेष कौतुक केले गेले.
आवर्जून वाचा- वेशांतर करत पोहचले मद्य कारखान्यात; तीन लाखाचे साहित्य जप्त
संस्था, पदाधिकारी, व्यापाऱयांचे सहकार्य
कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनात विविध सामाजिक संस्था, विविध पदाधिकारी, वैद्यकीय सेल, व्यापारी वर्ग यांनी विशेष सहकार्य केले. कोरोनाला तूर्तास अटकाव घालण्यात यश आले असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्यात १६ मेस पहिला रुग्ण आढळला होत. त्यानंतर एकूण २ हजार १२७ रुग्ण पॉझिटिव्ह होते, पैकी २ हजार ७८ रुग्ण बरे झाले. तर ४९ रुग्ण कोरोनामुळे मृत झाले आहेत. या व्यतिरिक्त ३४० रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे.
..या गावात शिरकाव नाहीच
तालुक्यातील गोंदेगाव, भामर्डी, कंडारी, निशाणे खुर्द, गांगापुरी, फुलपाट, भोकणी, भौद खुर्द, दोनगाव खुर्द, लाडली. या दहा गावांत कोरोचा आजपर्यंत शिरकाव झालेला नाही, हे विशेष.
संपादन- भूषण श्रीखंडे