esakal | अपंग शिक्षक सकाळी गेले फिरायला...मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन्‌ 
sakal

बोलून बातमी शोधा

teacher death

पावसाची रिपरिप गेल्या दहा- बारा दिवसांपासून सुरू आहे. यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. यात पायाने अपंग असलेले शिक्षक नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. रस्त्यावरील शेतात असलेल्या मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले आणि घात झाला. 

अपंग शिक्षक सकाळी गेले फिरायला...मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन्‌ 

sakal_logo
By
आल्हाद जोशी

एरंडोल (जळगाव) : रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी सायकलवर फिरायला गेले असताना रस्त्यावरील शेतात असलेल्या मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी ते थांबले. पावसामुळे चिखल झाला असल्याने दर्शन घेत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. यामुळे सकाळी फिरायला गेलेल्या 47 वर्षीय अपंग शिक्षकाचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. 

पद्माई पार्कमधील रहिवासी शितलदास जिवन बडगुजर (मूळ रा. पिंपळकोठा) हे दररोज सकाळी धरणगाव रस्त्यावर सायकलने फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे आज देखील ते सायकलने फिरायला गेले. धरणगाव रस्त्यावर असलेल्या माधव रामू पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या मुंजोबाच्या मंदिरात ते दर्शनासाठी गेले असता पाय धूत असतांना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मयत शितलदास बडगुजर हे एका पायाने अपंग होते. 

सर तुमच्याकडे आलेत का... 
पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक होते. सकाळी फिरायला गेलेले शितलदास बडगुजर हे घरी न आल्यामुळे सर्वांनी तपास करण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जिवनदास बडगुजर यांनी दिनेश बडगुजर यांना फोन करून सर तुमच्याकडे आले आहेत का अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी नाही सांगितल्यानंतर बाहेर तपास करण्यास सारेजण पडले. 

सायकल दिसल्याने उघडकीस आली घटना 
त्यानंतर दिनेश बडगुजर व अन्य नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता धरणगाव रस्त्यावर असलेल्या माधव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची सायकल आढळून आले तसेच विहिरीजवळ चप्पल सापडल्यामुळे त्यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता पुरुषाचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व प्रेत बाहेर काढले असता ते बडगुजर यांचे असल्याचे आढळून आले. शितलदास बडगुजर यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी शिक्षक, नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मयत शितलदास बडगुजर यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई- वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. दिनेश बडगुजर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. 

संपादन : राजेश सोनवणे 

loading image
go to top