esakal | उभ्या लक्झरी बसला ट्रकची धडक; चालक ठार. 
sakal

बोलून बातमी शोधा

उभ्या लक्झरी बसला ट्रकची धडक; चालक ठार. 

सुदैवाने लक्झरी मधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. धडक दिल्यानंतर लक्झरी बस समोरच असलेल्या व्यापारी संकुलाजवळ गेली.

उभ्या लक्झरी बसला ट्रकची धडक; चालक ठार. 

sakal_logo
By
अल्हाद जोशी

एरंडोल  ः झारखंड मधून मजुरांना घेऊन ठाणे येथे जाणारी लक्झरी बस चहापाणी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने मागच्या बाजूस दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात लक्झरी चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नवीन बसस्थानकाजवळ झाला. दुर्घटना घडली त्यावेळी बसस्थानक परिसर निर्मनुष्य असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

झारखंड येथून सुमारे ४६ मजूर घेऊन ठाणे येथील रिलायन्स कंपनी येथे जाणारी लक्झरी बस (जे.एच.२२ ए.६५७४) आज पहाटेच्या सुमारास नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबली होती. बसवर निझरनंदी निर्मलनंदी व शंभूनाथ बनर्जी हे दोन चालक होते. चहा घेतल्यानंतर चालक शंभूनाथ बनर्जी हा बस चालवण्यासाठी चालक बाजूने चढत असताना जळगावकडून येणाऱ्या ट्रक (जि.जे.०३ बी.व्ही.९३७८) ने लक्झरीस मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. लक्झरीस धडक दिल्यामुळे चालक शंभूनाथ बनर्जी (वय ४३, रा.कटींग पश्चिम बंगाल) हा रस्त्यावर फेकला गेला व त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. लक्झरीचे चाक त्याच्या पायावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. सुदैवाने लक्झरी मधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. धडक दिल्यानंतर लक्झरी बस समोरच असलेल्या व्यापारी संकुलाजवळ गेली.

अपघातस्थळी दिवसभर नागरिक व प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र अपघात पहाटे झाल्यामुळे परिसर निर्मनुष्य असल्यामुळे मोठी जीवितहानी टाळली. याबाबत लक्झरी चालक निझरनंदी निर्मलनंदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक बासुकीनाथ गोमतीप्रसाद सिंग याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image