esakal | पोलीस स्टेशन एक; भूमिपूजन दोनदा तर उद्‌घाटन तिनदा
sakal

बोलून बातमी शोधा

erndol police station

नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर 2018 मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पोलीस स्टेशन एक; भूमिपूजन दोनदा तर उद्‌घाटन तिनदा

sakal_logo
By
आल्हाद जोशी

एरंडोल (जळगाव) : येथील नवीन पोलीस स्टेशनचे राजकीय घडामोडीत दोनदा भूमिपूजन करण्यात आले; तर पूर्ण झालेल्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन तिनदा करण्यात आले. नवीन पोलीस स्टेशन एक, भूमिपूजन दोनदा तर उद्‌घाटन तिनदा असा आगळावेगळा प्रकार येथे पहावयास मिळाला.

पोलीस स्टेशन ब्रिटीश काळापासून महसूल प्रशासनाच्या लहान जागेवर कार्यान्वित होते. पोलिस स्टेशन स्वमालकीच्या जागेत प्रशस्त, सर्व सोयींनीयुक्त असावे यादृष्टीने माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी सुमारे एक कोटी सहा लाख रुपये मंजूर करून घेतले. नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर 2018 मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

नाराजी म्‍हणून पुन्हा भुमिपूजन
भूमिपूजनासाठी डॉ. सतीश पाटील, माजी खासदार ए. टी. पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. भूमिपूजनाच्या दिवशी माजी खासदार नियोजित वेळेवर न आल्यामुळे डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर खासदार ए. टी. पाटील आल्यामुळे त्यांनी भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

श्रेयवादात तिसऱ्यांदा उद्‌घाटन
नवीन पोलीस स्टेशनचे दोनदा भूमिपूजन करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली. सुमारे दोन वर्षाच्या कालावधीनंतर बांधकाम पूर्ण झाले.1 नोव्हेंबर रोजी गृहमंत्री अनिल देशमुख अमळनेर दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अमळनेर येथून नवीन पोलीस स्टेशनचे ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्‌घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह येऊन पोलीस स्टेशनचे उद्‌घाटन केले. नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी आपण प्रयत्न केले, आपल्या कारकीर्दीतच निधी मंजूर झाला, बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केल्यानंतर देखील आमदार चिमणराव पाटील बांधकामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह 4 नोव्हेंबरला पोलीस स्टेशनचे उद्‌घाटन केले. 

सुरू झाली टोलेबाजी
माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी बांधकामाच्या मंजुरीसह निधी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार चिमणराव पाटील यांनी करू नये; असा टोला लगावला. प्रांताधिकारी कार्यालयासाठी नवीन जागा आपल्या कारकीर्दीत मंजूर झाली असून त्या कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा व बांधकामास सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी आमदार चिमणराव पाटील यांना केले. श्रेयवादाच्या लढाईत एक पोलीस स्टेशन, दोनदा भूमिपूजन व तिनदा उदघाटन असा प्रकार शहरात घडल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image