कोरोना संकटामध्ये ही...नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षाच 

रमेश धनगर 
Tuesday, 4 August 2020

शासनाने घोषित केलेल्या रकमेची शेतकऱ्यांना कोरोना संकटात आता खरी नितांत गरज आहे. तरी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. 
-शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष, विकास सोसायटी, गिरड (ता. भडगाव)

गिरड (ता. भडगाव): राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची रक्कम देण्यात आली. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान, तसेच दोन लाखांवर कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी या घोषणांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आता कोरोनाकाळात रक्कम मिळाली, तर जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. 

सध्या खरिपाची मशागत सुरू असून, त्यात निंदणी, कीटकनाशकांची फवारणी व रासायनिक खतांचा डोस देणे सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची तातडीची गरज आहे. शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास शेती उत्पन्नावर विपरित परिणाम होऊ शकतो. नाइलाजाने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराकडे हात पसरावे लागतील. शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा मूळ उद्देश यामुळे सफल होणार नाही. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ ५० हजार रुपये थेट टाकावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील अध्यादेश कधी निघणार, याकडेच शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

जिल्ह्याची स्थिती 
कर्जमुक्ती यादीतील शेतकरी : १,४३,८३२ 
कर्जमाफीच्या तक्रारी केलेले शेतकरी : ५,०१७ 

 संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girade Corona crisis neglect of farmers who repay their loans regularly