‘कोरोना’ आटोक्यात येतोय, काही काळ मास्क लावाच ! 

‘कोरोना’ आटोक्यात येतोय, काही काळ मास्क लावाच ! 

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या कमी होत आहे. मृत्युदरही २.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तो १ टक्क्यावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत नागरिकांनी कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी चांगले सहकार्य केले. आणखी काही महिने सहकार्य करा. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत तोंडाला मास्क लावणे हीच लस समजा. नक्कीच कोरोनाला आपण सर्व जण हद्दपार करू, असा आशावाद जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. जिल्ह्यातील जिल्हा बँक, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत शासनस्तरावरूनच निर्णय होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, की मी जसा रुजू झालो तसा कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी लक्ष घातले. आरोग्यविषयक सुविधा, ऑक्सिजन, आयसीयू बेड तयारीवर भर दिला. स्वॅब तपासणीची लॅबोरोटरी तयार केली. यामुळे लवकर स्वॅबचे रिपोर्ट येऊन रुग्णांवर उपचार करण्यास सुरवात करता आली. अगोदर नागरिक स्वतःहून कोरोना झाला म्हणून बाहेर सांगत नव्हते. मात्र त्यांना ते लवकर बरे तेव्हा होतील, जेव्हा ते रुग्णालयात येऊन उपचार घेतील. लवकर या, लवकर बरे व्हा, अशी योजना सुरू केल्याने बाधित रुग्ण लवकर सापडले. त्यांच्यावर लवकर उपचार झाल्याने ते बरे झाले. जे उशिराने आले त्यांच्याबाबत आम्ही प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत संसर्गाने त्यांच्या पेशींवर हल्ला केलेला होता, सोबतच त्यांना विविध व्याधी होत्या. यामुळे त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. नंतर कंटेटन्मेंट झोनचा परिसर कमी केला. होमक्वारंटाइनची सुविधा दिली. यामुळे आणखी बाधित रुग्ण लवकर आढळले. शासकीय कोविड रुग्णालयासोबतच खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी दिली. यामुळे रुग्ण स्वतःहून तपासणी करून उपचार घेऊ लागले. 

जे नागरिक स्वतःहून येत नव्हते ते ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात आढळल्याने त्यांच्यावर उपचार करता आले. यामुळे रुग्ण लवकर सापडून त्यांच्यावर उपचार करता आले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीवर उपचार करता आले. यामुळे मृत्युदर कमी झाला. जे आता आढळत आहेत त्यांनी संसर्गाबाबत काळजी घेतली नाही असे आढळत आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गावर उपायांची जनजागृती झाली आहे. यामुळे गर्दीत जाणे ते टाळताहेत. गर्दी झाली तर मास्क लावत आहेत. आगामी काळात काही महिने जर त्यांनी स्वयंशिस्त पाळली तर एकही रुग्ण आढळणार नाही. 

ऑडिट सुरूच राहणार 
खासगी कोविड हॉस्पिटलने रुग्णांना दिलेल्या बिलांचे ऑडिट सुरूच राहणार आहे. ते बंद होणार नाही. काहींनी रुग्ण कमी होत असल्याने हॉस्पिटल बंद करण्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. ऑक्टोबरअखेरपर्यंतचे ऑडिट सुरूच राहील. त्यानंतरही खासगी कोविड रुग्णालय सुरू असल्यास त्यांचे ऑडिट होईलच. 

शेती, उद्योगांकडे लक्ष देणार 
कोरोनामुक्त जिल्हा झाल्यानंतर शेतीविषयक योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी, उद्योजकांचे उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याबाबत उद्योजकांची बैठक बोलावून त्यांच्याकडून अडीअडचणीची माहिती घेणार आहे. स्थानिक स्तरावरून सर्व मदत त्यांना केली जाईल. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com