
मुळात नेत्रदान करण्याबाबत असलेले गैरसमज याला कारणीभूत ठरतात. मात्र, नेत्रदान करणाऱ्यांमुळे बुबुळाच्या आजाराने अंध झालेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे पुन्हा दृष्टी देता येते.
जळगावः सुंदर जग पाहण्याचा आनंद सर्वच जण घेतात. परंतु जे जन्मापासून, अपघाताने अथवा आजारामुळे अंध आहेत ते हिरवा निसर्ग आणि सुंदर जग पाहण्यापासून वंचित राहतात. त्यांच्यासमोर असतो फक्त अंधार. अशा अंध:कारमय जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवून "नेत्रदान हेच श्रेष्ठदान' मानणारे मरणोत्तर दृष्टिदान करून सृष्टीचे दर्शन घडवितात. अशा नेत्रदात्यांमुळेच दृष्टिहिनांचे जीवन सुंदर करण्यासाठी नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. जळगावातील मांगीलाल बाफना नेत्रपेढीने 21 वर्षात 238 दृष्टिहिनांना नवदृष्टी मिळाली आहे.
मोतीबिंदूच्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करणारे डॉ. भालचंद्र यांचा स्मृतिदिन (10 जून) जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. पण, जगात आजही लाखो अंध व्यक्ती आहेत; पण मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. मुळात नेत्रदान करण्याबाबत असलेले गैरसमज याला कारणीभूत ठरतात. मात्र, नेत्रदान करणाऱ्यांमुळे बुबुळाच्या आजाराने अंध झालेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे पुन्हा दृष्टी देता येते.
वर्षभरात केवळ सातच नेत्ररोपण
जळगावात मांगीलाल बाफना नेत्रपेढी ही नेत्रदान स्वीकारणारी आणि मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणारी नेत्रपेढी आहे. बाफना नेत्रपेढी 3 मार्च 1999 पासून दृष्टिदानाचे काम करीत असून, गेल्या एकवीस वर्षात 518 दात्यांनी नेत्रपेढीकडे नेत्रदान केले आहे. त्यांच्या नेत्रदानामुळे या पेढीतर्फे शस्त्रक्रियेद्वारे 238 जणांना सृष्टी नव्याने पाहता आली आहे. यात गेल्या वर्षभरातील काम पाहिल्यास नेत्रपेढीत 34 जणांनी नेत्रदान केले असून, 7 जणांना नवीन दृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे.
दृष्टी मिळण्यासाठी प्रतीक्षा
नेत्रदानाबाबत असलेल्या गैरसमजांमुळे आजही ही चळवळ धीम्यागतीने सुरू आहे. यामुळे नेत्ररोपण देखील होऊ शकत नाही. गेल्या चार- पाच वर्षांत खूप जनजागृती करण्यात आली आहे. तरी देखील नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. वर्षभरात केवळ 34 जणांनी नेत्रदान केले. यामुळेच आजच्या स्थितीला आठ जण दृष्टी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
"कांताई'त 14 हजार शस्त्रक्रिया
चार वर्षांपूर्वी शहरात सुरू झालेल्या कांताई नेत्रालयात देखील मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. या चार वर्षांच्या कालावधीत दोन लाख जणांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, 14 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात तिरळेपणा, जन्मतः मोतीबिंदू असलेल्या दीडशे मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नेत्रदान कोण करू शकतो?
एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करू शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाइकांनी त्याच्या इच्छेचा आदर ठेवून कार्यवाही करायला हवी. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, चष्मा वापरत असणाऱ्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.