esakal | कृषी विभागाचा अंकुर कसा फुलणार; इतकी पदे आहेत रिक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

agreeculture

जिल्ह्यात कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. रिक्तपदे भरेपर्यंत आहे, त्या कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

कृषी विभागाचा अंकुर कसा फुलणार; इतकी पदे आहेत रिक्‍त

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : शासकीय योजनांचा प्रचार, प्रचार करावा, की शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करावे की नुकसानीचे पंचनामे करावेत, असा प्रश्‍न कृषी सहाय्यकांसमोर ठाकला आहे. ७६३ मंजूर पदांपैकी २९७ पदे रिक्त असल्याने कृषी विभागच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ही पदे भरली गेली नाहीत. 
देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालावर चालते. शासनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देते. नुकसान झाले तर भरपाई देते, शेतीची कामे लवकर होण्यासाठी यांत्रिकीकरणासाठी अर्थसहाय्य करते. शेतमाल शासकीय दराने खरेदी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र जर शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना कृषी विभागातर्फे पोचविल्या जातात. तो शेवटचा घटक कृषी सहाय्यक नसेल, तर शासनाची ही कामे कशी होणार? 
जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. मात्र केवळ दहा तालुक्यांत तालुका कृषी अधिकारी कार्यरत आहेत. १६ पदे रिक्त आहेत. कृषी तालुका तालुक्याची मदार असते. जळगाव, भुसावळ, बोदवड, रावेर, धरणगाव, जामनेर, चोपडा, पारोळा येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सोबतच कृषी सहाय्यकांची पदेही रिक्त आहेत. कृषी सहाय्यक पंचनामे करतात, शासकीय योजनेची सर्वच कामे कृषी सहाय्यकांना करावी लागतात. 

काही अधिकारी कोरोनाबाधित 
सततच्या पावसामुळे उडीद व मुगाचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनासदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे अनेक जण आजारी रजेवर आहेत. जी कार्यरत आहेत, त्यांच्यावरच कृषी विभागाची मदार आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर काम करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. 

राज्य सचिवांकडे प्रस्ताव 
रिक्त पदे भरण्यासाठी कृषी विभागाने दोन वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत याच्या स्वाक्षरीने प्रस्ताव गेले आहेत. तरीही रिक्त पदे भरली जात नाहीत. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे उडीद, मुगाचे २५ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर नुकसान झाले असताना त्यांच्या पंचनाम्यासाठी कृषी सहाय्यकच नाहीत. आहेत ती अत्यल्प आहेत. यामुळे पंचनामे लवकर कशी होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकूणच कृषी विभागात सुमारे तीनशे पदे रिक्त आहेत. 

पद--मंजूर पदे--भरलेली पदे--रिक्त पदे 
तालुका कृषी अधिकारी--२६--१०--१६ 
मंडळ कृषी अधिकारी--५९--२९-३० 
पर्यवेक्षक--१११--६९--४२ 
कृषी सहाय्यक--४९५--३२२--१७३ 
लिपिक--७२--३६--३६ 

संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top