खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का ?  बैठकीनंतर ही ‘सस्पेन्स’ कायम 

सचिन जोशी
Wednesday, 23 September 2020

खडसेंच्या प्रवेशाने पक्षासाठी नेमकी कशी स्थिती निर्माण होईल, कोणत्या मतदारसंघांवर त्याचा प्रभाव पडेल, याबाबत बैठकीच चाचपणी झाल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव  : भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर वारंवार नाराजी व्यक्त करणाऱ्या माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतील कथित प्रवेशाबाबत आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चाचपणी झाली. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यावर संमिश्र मत दिल्याचे सांगितले जात आहे. खडसेंनी मात्र, ‘याबाबत मला काहीही माहीत नाही, ज्यांची बैठक होती त्यांनाच विचारा?’ या शब्दात या राजकीय चर्चेला फेटाळून लावले. त्यामुळे खडसेंच्या कथित राजकीय भूमिकेचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. 

राज्याच्या नेतृत्वावर, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप करत खडसेंनी गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मंत्रिमंडळातील राजीनाम्यापासून ते नाराज असल्याने विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी नाकारल्यावर व नंतरही त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. अलीकडेच शिवसेनानेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी त्यांना सेनेची ऑफर दिली. तर राष्ट्रवादीतही खडसेंचे स्वागत करुन, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. 

राष्ट्रवादीची मुंबईत बैठक 
यादरम्यान २३ तारखेचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा जळगाव दौरा रद्द होऊन जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत मुंबईतच पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले, ती बैठक आज झाली. पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जिल्ह्यातून माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप वाघ आदी बैठकीस उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेशाने पक्षासाठी नेमकी कशी स्थिती निर्माण होईल, कोणत्या मतदारसंघांवर त्याचा प्रभाव पडेल, याबाबत बैठकीच चाचपणी झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत काहींनी अनुकूल तर काही नेत्यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. त्यामुळे या विषयावर कुठलेही मतैक्य न होता, संभ्रम कायम राहिला. 

त्या पक्षाच्या बैठकीशी आपला काय संबंध? या विषयी आपल्याला काहीच माहीत नाही, त्याबद्दल कसे बोलणार? ज्यांची बैठक होती, ज्यांनी विषय चर्चेला आणला त्यांनाच विचारा. 
- एकनाथराव खडसे 

मुंबईतील बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी झाली. पवार साहेब, अजित पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकूल मत व्यक्त केले. हा विषय अंतिम निर्णयापर्यंत पोचू शकला नाही. 
- ॲड. रवींद्र पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aknathrav Khadse held a meeting on joining the NCP, but the suspension of joining the party remained