नियोजन चुकलेच ! पण उत्तरदायित्य कुणाचे? 

amrut
amrut

जळगाव ः  तीन वर्षांपासून रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना, भरीस भर म्हणून भुयारी गटार योजनेचा भार आणि त्यामुळे होत्या-नव्हत्या त्या सर्वच रस्त्यांची लागलेली वाट.. हे आहे जळगावकरांचे नशीब. सुप्रीम कॉलनीतील प्रलंबित पाणीप्रश्‍न सुटल्याचे समाधान आहेच, पण महापौरपती कैलासआप्पा म्हणतात त्याप्रमाणे ‘अमृत’च्या कामाचे नियोजन चुकलेच आणि त्या चुकलेल्या नियोजनामुळे जळगाव शहरातील उर्वरित ९५ टक्के जनतेच्या नशिबी आलेल्या नरकयातनांचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार? 

आवश्य वाचा- सीसीआय, पणनकडून १४ लाख क्विंटल कापूस खरेदी 

 
तीन वर्षांपासून रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना, त्यामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, योजना पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे न करण्याचे शासनाचे आदेश आणि त्यात वर्षभरापासून सुरू झालेल्या भुयारी गटारांच्या कामामुळे उरल्यासुरल्या रस्त्यांची लागलेली वाट. एखाद्या गावखेड्यालाही लाजवेल असे आहे हे आधुनिक जळगाव शहराचे अपडेटेड चित्र. 
‘अमृत’च्या विषयावर खरेतर अनेकदा लिहून झाल्यानंतरही या कामावर काम करणाऱ्या महापालिका, मजिप्रा व मक्तेदार एजन्सी या तिन्ही यंत्रणांना काही सोयरसुतक नाही, असेच दिसते. तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय तर नाहीच, उलट या कामासंबंधी बैठकांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढण्यात यंत्रणांचे प्रतिनिधी धन्यता मानतात. 


कार्यकाळ संपत असताना माध्यमांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देणारे महापौर, त्यांचे पती ‘अमृत’च्या कामाचे नियोजन चुकलेच, असे खुल्या दिलाने मान्य करतात. सोबतच शहरातील प्रभागांचे विभाग करून विभागनिहाय अमृतचे काम हाती घ्यायला हवे होते, असेही ते म्हणतात. पण, त्यांनी हे मान्य करेपर्यंत बराच काळ लोटला आहे, तोवर पाणी नाकापर्यंत पोचून गेलेय. त्यामुळे योजनेचे काम सोडताही येत नाही आणि पूर्णही होत नाही, अशी अवस्था झालीय. 

साडेपाच लाख लोकांना प्रचंड यातनां
आपण पाच-सहाशे चौरसफुटांचे घर बांधतो, तेव्हाही आपली गरज, उपलब्ध निधी, त्यात करावयाचे काम, त्यानुसार आर्किटेक्ट, विकासकाची नियुक्ती करून टप्प्याटप्प्याने कामाला मूर्त रूप देतो. येथे तर साडेपाच लाख लोकसंख्येच्या जीवनाचा, अडीचशे कोटींच्या कामाचा प्रश्‍न होता. शिवाय, पालिका, मजिप्रा अथवा दोन्ही मक्तेदार एजन्सींकडे तज्ज्ञांची कमी नव्हती. तरीही, कैलासआप्पा म्हणतात तसे पालिकेचे नियोजन कसे व का चुकले? बरं, हे नियोजन चुकल्याचे लक्षात आल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत? नियोजन चुकल्यामुळे साडेपाच लाख लोकांना प्रचंड यातनांना सामोरे जावे लागतेय. अनेकांना हाडे, मणक्यांचे आजार जडतायत. धुळीमुळे श्‍वसनयंत्रणेच्या समस्या निर्माण होतायत, त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित राहतात. 

उत्तरदायित्व कोण स्वीकारणार

महापौरपद असो की उपमहापौरपद.. किंवा समितीचे सभापतिपद. नगरसेवकपद असो की या सर्वांच्या नेतृत्वाची मनीषा.. ते मिळविण्यात सर्वांनाच स्वारस्य. पण, या चुकलेल्या नियोजनामुळे शहरवासीयांच्या पदरी आलेल्या नरकयातनांचे उत्तरदायित्व कुणी स्वीकारायला तयार नाही. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com