गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढणार; काय आहे कारण 

देविदास वाणी
Sunday, 1 November 2020

यंदा चांगल्या पावसाने थंडीचा कडाका वाढेल. यामुळे गव्हाची पेरणी वीस हजार हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता आहे. कापसाचा हंगाम झाल्यावर शेतकरी हरभऱ्याची अधिक पेरणी करतील. बियाण्याचा मुबलक पुरवठा उपलब्ध झाला आहे. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

जळगाव : यंदा चांगल्या पावसामुळे कडाक्याची थंडी पडण्याची चिन्हे आहेत. कडाक्याची थंडी गव्हासह रब्बी हंगामाला पोषक असते. यामुळे गव्हाचा पेरा यंदा वाढणार आहे. सुमारे तीस हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते. त्यादृष्टीने पेरणीची तयारी सर्वत्र सुरू आहे. 
मान्सून पूर्णपणे परतला आहे. यामुळे वातावरण कोरडे आहे. वातावरणात गेल्या चार दिवसात बदल झाले आहेत. गेले दोन दिवस सायंकाळनंतर तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. पुढे थंडी वाढेल, असे संकेत मिळत आहेत. यंदा थंडी चांगली राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता. 
मका, बाजरीचे दर कमी आहेत. गव्हाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. गव्हाला मागणी आहे. मक्याचे वन्यप्राणीदेखील अधिक नुकसान करतात. विविध नदीकाठच्या भागासह इतर भागातही जलसाठे मुबलक आहेत. यामुळे गव्हाची पेरणी यंदा वाढेल असे चित्र आहे. 
जळगाव जिल्ह्यात सुमारे २८ ते ३० हजार हेक्टरवर गहू पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग काही शेतकरी गटांच्या मदतीने खपली गव्हाची पेरणीचे नियोजन करीत आहे. त्यासाठी मोफत बियाणे वितरण केले जाणार आहे. ७५ एकरात हा गहू असेल. गव्हाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. एकरी ४० किलो बियाणे गहू पेरणीसाठी लागते. यातच अनेक शेतकरी घरातील बियाण्याची पेरणीदेखील करतात. पेरणीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. 

दिवाळीनंतर पेरण्यांना वेग 
सोयाबीन, मूग, उडदाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गव्हाची पेरणी होईल. पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. दिवाळीनंतर पेरणी अनेक भागात वेग घेईल. परंतु त्यापूर्वीदेखील पेरणी उरकून घेण्याचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत. पूर्वमशागत, शेत भुसभुशीत करून घेतले जात आहे. अनेक शेतकरी ठिबक, तुषार सिंचनाचा उपयोग करून गहू पेरणीचे नियोजन करीत आहेत. पेरणी यंदा वाढणार असल्याने कृषी विभागानेही बियाण्याचा पुरेसा पुरवठा करून घेतल्याचे चित्र आहे. 

 

गेल्या दोन वर्षातील गव्हाचे उत्पादन असे 
वर्ष--पेरणी हेक्टर--उत्पादन (मे.टन) 
२०१८-१९--२० हजार ७०१--४५ हजार ६०४ 
२०१९-२०--२७ हजार--६८ हजार ८५० 
२०२०-२१-- लक्षांक ३० हजार हेक्टर

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon the area under wheat will increase