ऑडिओ क्लिप व्हायरलनंतर भाजपात खळबळ, चंद्रकांतदादानी खडसेंशी ऑनलाइन साधला संवाद 

मिलींद वानखेडे
Wednesday, 30 September 2020

ऑक्टोबर महिन्यातच खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. खडसे यांना राष्ट्रवादी कोणते पद देणार, यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव  : नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. त्यात मंगळवारी रात्री खडसेंची कार्यकर्त्या सोबतची संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे भाजपात देखील खळबळ उडाली असून तातडीने भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाइन बैठक बोलाविली. या बैठकीत खडसेंनी सहभाग घेत चंद्रकांतदादांशी गुप्तगू झाली आहे. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय संघटन प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, विजय पुराणिक आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने ते ऑनलाइन बैठकीला अनुपस्थित होते. खडसेंनी मात्र या विषयावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. 

खडसे यांचा कार्यकर्त्यांशी झालेला संवाद मंगळवारी व्हायरल झाला होता. योग्य संधी मिळाल्यानंतर आपण भाजप सोडण्याचा विचार करू, असे खडसे यांनी त्यात म्हटल्याचे ऐकू येत होते. या क्लिपच्या सत्यतेविषयी खडसेंकडून नकार किंवा होकारही देण्यात आलेला नाही. खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान मिळाले नसल्याबद्दल त्यांच्या समर्थकांत नराजी आहे. त्यांना भाजपमध्ये कोणत्याच पदावर संधी मिळाली नसल्याने खडसे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यांनी काहीतर निर्णय घ्यावा, यासाठी कार्यकर्ते त्यांच्याशी बोलत असतात. त्यातूनच हा संवाद झाला आणि ती क्लिप व्हायरल झाली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी खडसेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की नाही, हे समजू शकले नाही. मात्र या बैठकीला हजर राहून आपण पक्षासोबतच असल्याचे खडसे यांनी दाखवून दिले आहे. 

खडसेंनी दिला बैठकीचा दुजोरा

या संदर्भात खडसे यांना विचारले असता त्यांनी बैठक झाल्याचा दुजोरा दिला आहे. या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याविषयी, राज्यातील विविध समस्या आणि राजकीय घडामोडी याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या बैठकीविषयी अधिक बोलणे त्यांनी टाळले आहे. 

राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा 
खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठोकपणे सांगत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जळगावमधील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खडसे यांना राष्ट्रवाीत प्रवेश देण्यासाठी अट घालावी, हे सांगण्याचा प्रयत्न केला. खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांना भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लावण्याचीही सूचना होती. पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्यांनी सांगितले होते. ऑक्टोबर महिन्यातच खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. खडसे यांना राष्ट्रवादी कोणते पद देणार, यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पक्षाकडून मनधरणीचे प्रयत्न 
या चर्चेनंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत खडसे यांना आमंत्रित करून भाजपने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पक्षाने आपले योग्य पद देऊन पुनर्वसन करावे, अशी खडसे यांची अपेक्षा आहे. भाजप आता खडसेंना कसे शात करणार, याकडे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon audio clip went viral, BJP immediately called a meeting. Khadse interacted with Chandrakant Patil