लाचखोर प्रांताधिकाऱ्यांसह दोघांना जामीन; तर मिळू शकते कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

वाहने सोडविण्यासाठी प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. मोबाईलवर बोलणे होऊन पंटरच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये घेतल्याप्रकरणी प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप या देाघांना अटक करण्यात आली.

जळगाव : डंपर सोडण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप या दोघांना अटक केली होती. शनिवारी (ता. २२) दोघांना न्या. डी. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना तात्पुरता जामीन मंजूर केला. 
अवैध वाळू वाहतुकी संदर्भात ‘सकाळ’ने ठोस भूमिका घेत, प्रशासनाला धारेवर धरले होते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील वाळू पावत्यांवर जळगावच्या गिरणा नदीतून वाळूचे बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. याप्रकरणी ३ ऑगस्टला एका नगरसेवकाचे दोन वाळू डंपर पकडून ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात लावण्यात आले होते. ही वाहने सोडविण्यासाठी प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. मोबाईलवर बोलणे होऊन पंटरच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये घेतल्याप्रकरणी प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप या देाघांना अटक करण्यात आली. अटकेनंतर शनिवारी सकाळी दोघांना न्या. डी. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. 

दोघांना तात्पुरता जामीन 
न्यायालयात हजर केल्यावर सरकार पक्षाने पाच दिवस कोठडीची मागणी केली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन न्यायालयाने प्रांताधिकारी दीपमाला चौरे, लिपिक अतुल सानप अशा दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांना तात्पुरता जामीन देण्यात आला असून, अटकेच्या तारखेपासून १५ दिवस गरज भासल्यास केव्हाही तपासाधिकारी कोठडीची मागणी करू शकतात. पंचवीस हजारांच्या जातमुचलका, तसेच सलग तीन दिवस लाचलुचपत विभागात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. 

‘तो’ पंटर झाला साक्षीदार 
वाळू व्यावसायिक आणि तक्रारदार वाळू व्यावसायिकाचा मित्र असलेल्या पंटरनेच प्रथम रक्कम हातात घेतली. दाखल गुन्ह्यात त्याला साक्षीदार करण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात हे सर्व संशयित आरोपीदेखील आहेत. 

महसुली वादाची चर्चा 
गेल्या सहा-सात महिन्यांपासून महसूल खात्यात अंतर्गत वाद असल्याचे वेगवेगळ्या घटनेतून समोर आले. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी याप्रकरणी पोस्ट टाकल्यावर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर गुप्ता यांच्याविरुद्ध तहसीलदार यांच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल आहे. 

ग्रुपवरून हकालपट्टी 
लाचखोरीचे प्रकरण घडल्यानंतर महसूल विभाग पूर्णतः ढवळून निघाला असून, जिल्‍हाधिकाऱ्यांनी घडले प्रकरण गांभीर्याने घेतले असून, श्रीमती चौरे यांना कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपवरून काढण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Bail for both including the prefect on Bribe case