धागा धागा जोडत लावला ‘लेफ्टनंट’चा स्‍टार 

राजेश सोनवणे 
Tuesday, 24 November 2020

आजोबा आर्मीत असल्‍याने आपण आर्मीतील अधिकारी होण्याचे स्‍वप्न मनाशी ठरविले होते. त्‍यानुसार अगदी दहावी उत्तीर्ण झाल्‍यापासून त्‍याने तयारी सुरू केली.

जळगाव : सैन्यात भरती होऊन देशसेवा करायचे अनेकांचे स्‍वप्न असते. बऱ्याच तरुणांची ही स्वप्नपूर्ती होते देखील. आजोबा आर्मीत असल्‍याने एक वेगळे आकर्षण सैन्याचे होते. हे पाहून आपणही आर्मीत जायचे; पण त्‍यापेक्षा वेगळे करून अधिकारी होण्याचे स्‍वप्न पाहिले आणि ते साकार देखील केले. किनगाव (ता. यावल) या गावातील राहुल पाटील या युवकाने आपल्‍या जिद्दीवर ‘लेफ्टनंट’ स्‍टार खांद्यावर लावून पदावर विराजमान झाला. 

वाचा- पारोळ्यात जनता कर्फ्यु; महामार्गासह बाजारपेठेत शुकशुकाट 
 

ग्रामीण भागातील तरुण पोलिस किंवा आर्मीत भरती होण्याची तयारी अगदी शालेय जीवनापासून करत असतात. बारावी होऊन किंवा पदवीचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर स्‍वप्नपूर्ती करत असतात. असेच स्‍वप्न (किनगाव, ता. यावल) येथील तेवीस वर्षीय राहुल अरुण पाटील येथील तरुणाने सैन्यात अधिकारी होण्याचे स्‍वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले. २० नोव्हेंबरला चेन्नई येथे झालेल्‍या दीक्षान्त समारंभात राहुलच्या खांद्यावर स्‍टार लावण्यात आले. 

वडील करतात टेलरिंगचे काम 
राहुल पाटील यांच्या घरची परिस्‍थिती तशी नाजूक. आई रंजना या घरीच असतात, तर वडील अरुण पाटील हे गावातच टेलरिंगचे काम करून मिळेल त्‍या पैशांत घर चालवतात. परंतु राहुलचे आजोबा हे आर्मीत होते. लहानपणापासून आजोबांना पाहून आपणही आर्मीत जाण्याचे स्‍वप्न राहुलचे होते. 

राहुलची घोडदौड 
आजोबा आर्मीत असल्‍याने आपण आर्मीतील अधिकारी होण्याचे स्‍वप्न मनाशी ठरविले होते. त्‍यानुसार अगदी दहावी उत्तीर्ण झाल्‍यापासून त्‍याने तयारी सुरू केली. दहावी झाल्‍यानंतर त्‍याची निवड सर्व्हिसेस प्रिपेसट इन्स्‍टिट्यूट (एसपीएल)मध्ये राज्‍यातील पन्नास जणांमधून झाली. यानंतर दीड वर्षापूर्वी यूपीएससीअंतर्गत ‘सीडीएस’ परीक्षा दिली आणि त्‍यात उत्तीर्ण झाला. त्यानंतर एसएसबी इन्स्‍टिट्यूट चेन्नई येथे एक वर्षापासून ट्रेनिंगला होता. 

आवश्य वाचा- सक्रिय रुग्णांचा गंभीर रुग्णही वाढले

...अन्‌ खांद्यावर लागले स्‍टार 
एक वर्ष ट्रेनिंग घेतल्‍यानंतर राहुल पाटील गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर विराजमान झाले. चेन्नई येथे झालेल्या दीक्षान्त समारंभात त्यांच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले. त्‍यांना डेहराडून येथे पोस्टिंग देण्यात आली आहे. महाराष्‍ट्रातील चार जणांची अशी निवड करण्यात आली असून, लेफ्टनंट पदावर पोचलेला राहुल पाटील जिल्ह्यातील बहुधा एकमेव तरुण आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon became an officer in the young army at Kingaon