परिस्थितीशी झगडणाऱ्या भिकाऱ्यांची फरफट थांबेना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मंदिराचे दरवाजे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने भिकाऱ्यांची खाण्यापिण्याची सोय याठिकाणी होत नसल्याने कुठेतरी हक्काचा आसरा मिळावा

जळगाव  : "कोरोना'चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. "लाकडाउन'मुळे शहरातील एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक, सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. सर्वांचेच जनजीवन विस्कळित झाले आहे. याला भिकारी देखील अपवाद नाही. बस, रेल्वे, धार्मिक स्थळे बंद असल्याने भिकाऱ्यांची फरफट होत असून, परिस्थितीशी कायमच झगडणाऱ्या या भिकाऱ्यांच्या संकटांत आणखी भर पडली आहे. शहरातील बहुतांश भिकाऱ्यांनी आता संकुलांच्या ओट्यांवरच ठाण मांडले आहे. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनचा काळ सुरू असल्याने निराधार असणाऱ्या भिकाऱ्यांवर मात्र याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. दररोज मंदिराच्या बाहेर रांगा लावणाऱ्या भिकाऱ्यांचे निवास व जेवणाची सोय याठिकाणी होत होती. परंतु मंदिराचे दरवाजे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने भिकाऱ्यांची खाण्यापिण्याची सोय याठिकाणी होत नसल्याने कुठेतरी हक्काचा आसरा मिळावा, यासाठी त्यांनी गोलाणी संकुल बंद असल्याने तेथेच ठाण मांडले आहे. 

सामाजिक संस्थांचा पुढाकार 
शहरात भिकाऱ्यांची मोठी संख्या असून, या भिकाऱ्यांची उपासमार होऊ नये, याचे भान ठेवून त्यांच्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्थांनी त्यांना दोन वेळचे जेवण, पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे भिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. 

तळिरामांपासून त्रास 
रात्री-अपरात्री तळीराम यथेच्छ दारू पिऊन संकुलाच्या ओट्यांवर झोपलेल्या भिकाऱ्यांना नाहक त्रास देऊन मारहाणही करीत असतात. पोलिसांनी या तळिरामांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. शहरातील अनेक दुकाने बंद असल्याने दुकानाच्या ओट्यांवर काही भिकाऱ्यांनी आसरा घेतला आहे. दररोज रेल्वे बंद असल्याने रेल्वेत भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील दुकानाचे ओटे सांभाळले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon beggars struggling with the situation will not stop