बंगाली कारागिरांची सुवर्णनगरीला प्रतीक्षा ...सात हजार लोक गेले परत !

सचिन जोशी
Saturday, 11 July 2020

दोन- अडीच महिन्यांपासून बंगाली कारागीर त्यांच्या गावी गेले आहेत. जवळपास सहा-सात हजार लोक गेले आहेत. काही परत येत आहेत. मात्र, बाजारपेठ पूर्ण सुरू झाल्यानंतर ते परततील. साधारण महिनाभरात ते सर्व परत येतील. 
- महेंद्र महिती, सचिव, जळगाव सुवर्णकार बंगाली कारागीर संघटना 

जळगाव : सुमारे ५१ हजारांचा टप्पा गाठलेल्या सोन्या-चांदीला आपल्या कलाकुसरचा साज चढवून दागिने घडविणाऱ्या बंगाली कारागिरांचा हात या कलेत कुणी धरणार नाही. त्यातही देशभरात विश्‍वासार्हतेमुळे जळगावची सुवर्ण बाजारपेठ लौकिकप्राप्त. त्यामुळे सुवर्णनगरीने कारागिरांना सोन्यासारखे जपलंय, पण कोरोना व लॉकडाउनमुळे हे कारागीर त्यांच्या गावी परतले असून, सुवर्णनगरी त्यांच्या प्रतीक्षेत आहे. 

जळगावच्या सुवर्णनगरीचे देशभरात नाव आहे. राज्यातील नव्हे, तर देशभरातील ग्राहक जळगावातून सोन्याचे दागिने घेण्याला प्राधान्य देतात. देशात लौकिकप्राप्त असलेल्या सुवर्णपेढ्या जळगावात आहेत. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली पेढीही याठिकाणी आहे. या बाजारपेठेने हजारोंना रोजगार मिळवून दिलाय. सोने-चांदीला कलाकुसरचा साज चढविण्यात बंगाली कारागीर अव्वल. त्यामुळे या मोठ्या बाजारपेठेने या कारागिरांची कला ओळखत हजारोंना आपल्या कुशीत सामावलेय. 

आठ हजार कारागीर 
जळगाव शहराचा विचार केला, तर शहरात जवळपास सात- आठ हजार बंगाली कारागीर आहेत. अन्य बंगाली लोकही असले, तरी ते वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आहेत. मात्र, दागिने घडविणाऱ्यांची संख्या शहरासह जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात आहे. हे कारागीर जळगाव शहरातील जुने जळगाव, वाल्मीकनगर, कांचननगर, शनी पेठ, जोशी पेठ, बालाजी पेठ आदी भागात स्थायिक झालेत. काहींची स्वत:ची घरेही झालीत, तर काही भाडेतत्त्वावर घर करून राहतात. 

कोरोनामुळे विस्थापित 
कोरोनाने या बाजारपेठेलाही मोठा फटका बसला. सलग तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे हाताला कामच नसल्याने यातील जवळपास सहा-सात हजार कारागीर पश्‍चिम बंगालमध्ये त्यांच्या गावी गेले. ते अद्याप परतलेले नाहीत. त्यापैकी केवळ ५०- ६० लोक परतले आहेत आणि जे गेले नाही, अशांची संख्या हजार आहे. त्यांच्या माध्यमातूनच सध्या दागिने घडविण्याचे काम सुरू आहे. अर्थात, मार्केटही पूर्णपणे न उघडल्याने मागणी कमी आहे. त्यामुळे या कारागिरांच्या हातालाही पूर्ण काम नाही. 

परतीची प्रतीक्षा 
सध्या शहरात लोकल लॉकडाउन सुरू असून, तो १३ जुलैपर्यंत असेल. तत्पूर्वी अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात काही दुकानांना अटी-शर्तींवर परवानगी दिली असून, सम-विषम तारखेला ही दुकाने सुरू असतात. १३ तारखेनंतर पूर्ण बाजारपेठ सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी वाढू शकते. अशावेळी या कारागिरांची गरज पडेल. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिक या कारागिरांच्या प्रतीक्षेत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Bengali artisans waiting for gold market seven thousand people went back!