बीएचआर गैरव्यवहार; लाभार्थ्यांची राजकीय नेत्यांसोबत ऊठबैस 

सचिन जोशी
Friday, 4 December 2020

बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे या अवसायकाने ताबा मिळविल्यापासून तो संशयाच्या भोवऱ्यात होता. सुमारे हजार कोटी रुपयांच्या ठेवींसह संस्थेची कोट्यवधीची मालमत्ता आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या अस्तानंतर अवसायकाच्या कार्यकाळातही संस्थेला ओरबाडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. अनेक बड्यांची नावे समोर येत असून, आणखी काही नावे ‘पाइपलाइन’मध्ये असल्याचे संकेत मिळताहेत. एखाद्या नव्हे, तर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा थेट किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष सहभाग या घोटाळ्यात दिसून येतोय. 
बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे या अवसायकाने ताबा मिळविल्यापासून तो संशयाच्या भोवऱ्यात होता. सुमारे हजार कोटी रुपयांच्या ठेवींसह संस्थेची कोट्यवधीची मालमत्ता आहे. ठेवीदारांना जास्त व्याजदाराचे आमिष दाखवत ठेवी मिळविल्या, नंतर त्यातून मालमत्ता खरेदीचा सपाटा संस्थापक प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी ॲन्ड कंपनीने लावला होता. काही मालमत्ता कर्जदारांकडून जप्त केल्याही आहेत. संस्थेच्या मालमत्ता विक्री करून त्यातून ठेवीदारांचे देणे द्यावे, असे निर्देश असताना अवसायक कंडारे याने ठेवीदार संघटना, मोठ्या राजकीय नेत्यांचे हस्तक अशांसोबत सलगी करून शांत डोक्याने गुन्हा केल्याचे तपासी यंत्रणेचे म्हणणे आहे. दाखल गुन्ह्यातील फरारी संशयित खानदेश मिल कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेले सुनील झवर यांच्या साई मार्केटिंग ॲन्ड ट्रेडिंग कंपनीच्या नावाने निविदा भरून अधिकाधिक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. 

संगनमताने कट 
अवसायकाच्या ताब्यात गेलेल्या व सोन्याचा धूर निघत असलेल्या बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेला लुबाडणाऱ्यांनी संघटितपणे कोट्यवधींचा मलिदा घशात घातला. मिळकतींची लूट केली. यामागे मोठ्या नेत्याचा हात असल्याचे सूतोवाच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. 

कंडारे-झंवर साथीदार 
अवसायक जितेंद्र कंडारे व साई मार्केटिंगचा सर्वेसर्वा सुनील झंवर यांची सलगी होती. सुनील झंवर याने राजकीय आश्रयातूनच काही वर्षांत आपले साम्राज्य उभे केले असून, याच राजकीय वलयाचा तो लाभार्थी आहे. लिलावप्रक्रियेत इच्छुकांपैकी धीरज रामचंद्र सोनी (नवी पेठ जळगाव), अब्दुल रहीम अब्दुल हक ऊर्फ बाबू लढ्ढा, अलोक शिवानी, प्रशांत महामुनगर (रा. प्रभात कॉलनी) यांच्यासह इतर इच्छुकांचे घनिष्ठ संबंध असल्याचे तपास यंत्रणेचे निष्कर्ष आहेत. अब्दुल रहीम अब्दुल हक व्यक्ती एका प्रतिष्ठित नगरसेवकाचा कार्यकर्ता असून, त्याचाही निविदाप्रक्रियेत सहभाग असणे हे रचलेल्या जाळ्यापैकी एक कडी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशाच पद्धतीने कुठल्यातरी डमी नावे निविदेत किंवा खरेदीच्या वेळेत वापरून मिळकती गडप केल्याचे तपासात आढळून आले आहे. 

पुण्यात खरेदी 
सुनील झंवर यांच्या साई मार्केटिंगच्या नावे नशिराबाद येथील तीन दुकाने, निगडी येथील तीन दुकाने व प्लॉट व घोले रोड पुणे येथील प्लॉट, नाशिक रोड आनंद प्लाझा येथील तीन दुकाने यासाठी निविदा भरण्यात आल्या. त्यापैकी नशिराबाद, नाशिक येथील खरेदी बाकी, तर घोले रोड, पुणे व नाशिक येथील मालमत्तेची साई मार्केटिंगच्या नावाने खरेदी झाली आहे. संबंधित मालमत्ता खरेदीदार सुनील झंवर अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यात काय कनेक्शन आहे, इतर कोण खरेदीदार या गँगमध्ये आहेत याचा शोध सुरू आहे.. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr patsanstha fraud case and political leader hand