भर चौकात तोडत होते मोटारसायकलचा लॉक; पोलिसांनी अखेर त्‍यांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

चौकात दोन चोरटे मोटारसायकलची चोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून क्रमांक नसलेल्या सात मोटारसायकली जप्त केल्या.

जळगाव : शहरात ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी पकडले असून, दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पंधरा दिवसांपासून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या सूचनेनुसार शहर ठाण्याच्या पथकाने मोटारसायकली चोरांचा शोध सुरू केला. 
प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी (ता.१७) रात्री आठच्या सुमारास शहरातील चित्रा चौक, गोविंदा रिक्षा, कोर्ट चौक, गणेश कॉलनी परिसरात सापळा रचला. यात चित्रा चौकात दोन चोरटे मोटारसायकलची चोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून क्रमांक नसलेल्या सात मोटारसायकली जप्त केल्या. निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ४०, रा. प्लॉट एरिया, अडावद, ता. चोपडा) आणि ज्ञानेश्वर गुलाब पाटील (२९, रा. वडगाव, ता. चोपडा) अशी संशयितांची नावे आहेत. 

निळकंठ राऊत पुण्यातील रहिवासी असून, पुण्यातून त्याने दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. राऊत याला पुणे व निगडी पोलिसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले असल्याने तो जळगावात राहत आहे. हस्तगत केलेल्या दोन लाख ४० हजारांच्या सात दुचाकी जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाणे, धरणगाव, यावल परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली. दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल धांडे आणि रतन गिते करीत आहेत. 

यांनी केली कारवाई 
शहर ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, बशीर तडवी, पोलिस नाइक अक्रम शेख, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bike robbery in market police watch and arrested