मुख्यमंत्री केवळ माझं कुटूंब..’चा टेप वाजवताय, आतातरी कृती करा-चित्रा वाघ

कैलास शिंदे
Wednesday, 11 November 2020

राज्यात महिलावर वाढणारे अत्याचार ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या, या घटना रोखण्यासाठी शासनाने पाउले उचलली पाहिजेत.

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझं कुटूंब, माझी जबाबदारी’ ही टेप वाजवित आहेत. मात्र राज्याचा कुंटूबप्रमुख म्हणून ती निभवत नाहीत. मुली, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यातील कुंटूबप्रमुख म्हणून महिला सुरक्षा करण्याची आपली ‘जबाबदारी’ पार पाडावी अन्यथा ही टेप बंद करावी, असा हल्ला भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चढविला. 

आवश्य वाचा- अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू !

पारोळा येथील पीडितेच्या कुंटूबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे आदी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पारोळा येथील त्या मुलीवर अत्याचार करून तीला मारून टाकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आज राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. महिला व मुलीवरील अत्याचार वाढला आहे. 

 

हाथरसवर बोलणारे गप्प का? 
हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. मात्र, त्यावेळी रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने पारोळ्याच्या घटनेबाबतही तेवढ्याच तडफेने आंदोलन केले पाहिजे. परराज्यतील मुलींना अब्रु आहे आणि आमच्या महाराष्ट्रातील महिला व मुली रस्त्यावर पडल्या आहेत काय? असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

वाचा- वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा ! -
 

महिला न्यायालय स्थापन करा 
राज्यात महिलावर वाढणारे अत्याचार ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या, या घटना रोखण्यासाठी शासनाने पाउले उचलली पाहिजेत. या प्रकरणी कारवाई होण्यासाठी राज्यात महिलासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केले पाहिजे. दिशा कायदा त्वरीत आमलात आणला पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ताबडतोब केली पाहिजे, असे अवाहनही त्यांनी केले. माजी आमदार स्मिता वाघ यांनी पारोळा येथील घटनेप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविला पाहिजे, अशी मागणी केली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP's chitra wagh criticized chief minister uddhav thackeray