दिवाळीनंतर सुरू होणार ‘सीसीआय’ची कापूस खरेदी 

देविदास वाणी
Sunday, 1 November 2020

शासकीय खरेदी सूरू झाली असती शासनाकडून ५८०० प्रती क्विंटलचा दर कपाशीला मिळाला असता. मात्र शासकीय खरेदी केंद्रे सूरू झालेली नाहीत.

जळगाव : जिल्ह्यात यंदा चांगला पाउस झाल्याने कपाशीचे चांगले उत्पन्न येणार आहे. अनेक बागायतदार शेतकऱ्यांचा कापूस घरातही आला आहे. शासनाकडून भाव चांगला जाहीर झाला. मात्र खरेदी केंद्र सुरू नाही. खासगी व्यापाऱ्यांकडे कपाशीला भाव कमी मिळत आहे. यामुळे घरात असलेल्या कपाशीच काय करावे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर होता. आता मात्र ‘सीसीआय’ने कापूस खरेदीस दिवाळीनंतरचा मुहूर्त काढला आहे. 

जिल्हयात यंदा कपाशीचा पेरा साडेपाच लाख हेक्टर झाला हेाता. मात्र झालेल्या अतीवृष्ठीने अनेक ठिकाणी कपाशीचे पिके नेस्तनाबतू झाली होती. त्या सुमारे एक ते सव्वा लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचा कापूस घरात येत आहे. 
शासकीय खरेदी सूरू झाली असती शासनाकडून ५८०० प्रती क्विंटलचा दर कपाशीला मिळाला असता. मात्र शासकीय खरेदी केंद्रे सूरू झालेली नाहीत. खासगी व्यापाऱ्यांकडे पाच हजार प्रती क्विंटलचा दर मिळते आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. 

सीसीआय’ने दर्शविली तयारी 
जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याविषयी ‘सीसीआय’चे विभागीय व्यवस्थापक अर्जुन दवे यांनी सांगितले की, सध्या कपाशीत आद्रतेच प्रमाण अधिक आहे. असा कापूस खरेदी करणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी कपाशीच्या आद्रतेचे प्रमाण कमी केले तर तो कापूस आम्हा घेणे शक्य होईल. दिवाळीनंतर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करू शकेल. 
 
शेतकऱ्यांनी कपाशी उन्हात सुकवून त्यातील आद्रतेचे प्रमाण कमी करावे. असा कापूस सीसीआय नक्की घेईल. ओला किंवा आद्रता असलेला कापूस सीसीआय खरेदी करू शकत नाही. शेतकऱ्यांनी कापूस सुकवून द्यावा. आम्ही लागलीच खरेदी केंद्र सुरू करू. 

– अर्जुन दवे, विभागीय व्यवस्थापक, सीसीआय. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cci cotton kharedi after diwali