esakal | चक्‍क पालिकेचे पाणी होतेय चोरी; अज्ञाताविरूद्ध गुन्हा अन् चोराला अभय

बोलून बातमी शोधा

water robbery}

शहरातील नागरिकांना बाराही महिने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या माध्यमातून गिरणा उद्‍भव योजना कार्यान्वित झाली आहे. ज्या मुळे शहरवासीयांना थेट गिरणा धरणातून पाणी उपलब्ध झाले आहे.

चक्‍क पालिकेचे पाणी होतेय चोरी; अज्ञाताविरूद्ध गुन्हा अन् चोराला अभय
sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरून टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळ पाण्याची चोरी करण्याचा प्रकार पालिकेच्या पथकाने उघडकीस आणला. ही पाणीचोरी कोण करीत होते, हे स्पष्ट दिसून आलेले असतानाही प्रत्यक्षात मेहुणबारे पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. त्या मुळे पालिकेकडून पाणी चोरणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. 
शहरातील नागरिकांना बाराही महिने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या माध्यमातून गिरणा उद्‍भव योजना कार्यान्वित झाली आहे. ज्या मुळे शहरवासीयांना थेट गिरणा धरणातून पाणी उपलब्ध झाले आहे. धरणापासून असलेल्या पालिकेच्या या जलवाहिनीला चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी छिद्रे पाडून, तर काही ठिकाणी व्हॉल्व्हवरून काही हॉटेलचालक, तसेच जवळचे शेतकरी पाण्याची सर्रास चोरी करायचे. टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळही असाच प्रकार सुरू होता. दरम्यान, या प्रकरणी मेहुणबारे पोलिस कसा तपास करतात व या प्रकरणी पाणीचोरी करणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अज्ञाताविरुद्ध गुन्हा 
पालिकेच्या पथकाने अधिक चौकशी केली असता, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडूनही या पाण्याची चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले होते. पाणीचोरीचा हा प्रकार गंभीर असल्याने पालिकेचे पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांनी पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे लिपिक नंदलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्री. जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की ४ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे, लिपिक नंदलाल जाधव व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मनोज पगारे, वाल्मीक सोनवणे, अमोल अहिरे, मनोज झोडगे, सोनुराम घुमरे आदी डेराबर्डी फिल्टर प्लान्ट ते गिरणा धरणापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीची पाहणी करीत असताना देवळी, आडगाव व टाकळी प्र. दे. शिवारातील व्हॉल्व्हला नळी जोडून आठ ते १२ जोडण्या, तसेच या मुख्य जलवाहिनीला एक इंच आकाराचे लोखंडी नेपल जोडून पुढे एक इंच पीव्हीसी पाइप जोडून एक कनेक्शन दिसून आले. 

पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याने शहरवासीयांचे हित लक्षात घेऊन आज आमच्या काही नगरसेवकांनी पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई व्हावी, यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांची भेट घेतली. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले. 
- दीपक पाटील, पाणीपुरवठा सभापती, चाळीसगाव पालिका 

संपादन ः राजेश सोनवणे