अवैध वाळू उपसा रोखणार आता सिसिटीव्ही,  कोणत्या गावावर असणार आता नजर  

देविदास वाणी
Friday, 11 September 2020

संतप्त झालेल्या आव्हाणे येथील ग्रामस्थांनी बुधवारी गिरणा नदीत आंदोलन केले होते. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलाविल्यानंतर त्यांनी वरील आश्‍वासन दिले. 

जळगाव  ः आव्हाणे (ता.जळगाव)येथील गिरणा नदीपात्रातून झालेल्या अवैध उपशाची पाहणी, चौकशी करण्यासाठी अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्यात येईल. ती समिती पाहणी करून अहवाल सादर करेल. दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. वाळू तस्करी रोखण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाक्यांसह सीसीटीव्ही लावण्यात येतील. वाळू तस्करी होत असलेल्या मार्गावर प्रतिबंध करण्यात येईल. आव्हाणे गावाला आठवडाभरात भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

आव्हाणे येथे गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होतो. त्यामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहेत. वाळू माफियांनी वाहतूक करण्यासाठी शेत रस्ते तोडले आहेत. त्याबाबत सातत्याने तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रारी करून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आव्हाणे येथील ग्रामस्थांनी बुधवारी गिरणा नदीत आंदोलन केले होते. 
आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलाविल्यानंतर त्यांनी वरील आश्‍वासन दिले. ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वाळू तस्करांकडून वापरण्यात येणारे मार्गही बंद करण्याबाबत चर्चा केली. 

नेमण्यात येणारी समिती गिरणा नदीपात्रातून झालेला अवैध वाळू उपसा, तहसीलदार, तलाठ्यांविषयीच्या तक्रारींच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. वाळू तस्करीवर पोलिस, महसूल, आर.टी.ओ., ग्रामपंचायतींच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, आर.टी.ओ.श्याम लोही, सहाय्यक पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, प्रभारी प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. आव्हाण्याचे हर्षल चौधरी, विठ्ठल पाटील, निवृत्ती चौधरी, प्रणील चौधरी, पंकज चौधरी आदी उपस्थित होते. जळगाव व धरणगाव तहसीलदारांविषयी आंदोलकांच्या तक्रारी होत्या. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वाळू तस्करीबाबत आव्हाणे, बांभोरी तलाठी, जळगाव, धरणगाव तहसीलदार कारवाई करीत नसल्याबाबत तक्रार केली. वाळू चोरी बंद करावी. वाळू माफियांनी तोडलेले शेत रस्ते तयार करुन द्यावेत. जळगाव, धरणगाव तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. आव्हाणे, सावखेडा, धरणगाव तालुक्यातील बांभोरी व आव्हानी येथील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Challenges to curb illegal sand extraction will be monitored by avhane villege CCTV now