esakal | धोक्याची घंटा : मुलांचा ‘स्क्रीन शेअरिंग’ सात तासांपर्यंत 
sakal

बोलून बातमी शोधा

धोक्याची घंटा : मुलांचा ‘स्क्रीन शेअरिंग’ सात तासांपर्यंत 

विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना किमान चार ते पाच तास सतत ऑनलाइन शिकविले जाते. परिणामी, मुलांमध्ये नेत्रपटलाचे आजार उद्भवत आहेत. स्क्विंट, डोळ्यांचा ताण, कोरड्या डोळ्यासारख्या समस्या देखील मुलांमध्ये दिसून येतात. 

धोक्याची घंटा : मुलांचा ‘स्क्रीन शेअरिंग’ सात तासांपर्यंत 

sakal_logo
By
दीपक महाले

जळगाव : लॉकडाउनमुळे मुलांच्या स्क्रीन शेअरिंगची वेळ लक्षणीय वाढली आहे. जिथे पूर्वी ते दिवसातून तीन तास स्क्रीन वापरत असे, आता ही वेळ सहा ते सात तासांपर्यंत वाढली आहे. यामुळे मुलांना डोळ्यांचे विविध विकार जडत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच शैक्षणिक संस्था बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन अभ्यास केला जात आहेत. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना किमान चार ते पाच तास सतत ऑनलाइन शिकविले जाते. परिणामी, मुलांमध्ये नेत्रपटलाचे आजार उद्भवत आहेत. स्क्विंट, डोळ्यांचा ताण, कोरड्या डोळ्यासारख्या समस्या देखील मुलांमध्ये दिसून येतात. 

चार ते पाच तास सातत्याने ऑनलाइन अभ्यास केल्यावर मुले मनाला ताजेतवाने करण्यासाठी गेम खेळतात, गाणी ऐकतात आणि मोबाइल-लॅपटॉपमध्ये चित्रपट पाहतात. हे चक्र बऱ्याच तासांपर्यंत देखील असते. 

लहानग्यांचे डोळे होताहेत क्षीण 
लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल, टीव्हीचा वापर वाढला आहे. अद्याप शाळा सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेता लहानग्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, असे सांगणारी यंत्रणा आता मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्याच मोबाईलचा आधार घेत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे चिमुरड्या डोळ्यांना तुम्ही किती ताण देणार, असा प्रश्‍न नेत्ररोगतज्ज्ञ विचारू लागले आहेत. अवघ्या पाच-सहा इंची स्क्रीनमुळे लहान मुलांच्या नेत्रपटलावर नकळत मोठा ताण येतो. त्यामुळे अनेकांना अल्पवयात चष्मे लागण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजात एकीकडे लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका, असे डॉक्टर सांगतात, तर दुसरीकडे त्याच मुलांकडे मोबाईल द्यावा लागत असून, हा मोठा विरोधाभास आहे. 

सातत्याने मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टीव्ही स्क्रीनकडे पाहिल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडून चुरचुर वाढते. त्यामुळे डोळ्यांची मधूनमधून उघडझाप करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आयट्रॉप वापरावा, ज्यांना चष्मा असेल तर नियमित वापरावा आदी गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. 
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ, जळगाव 

अशी घ्या काळजी 
- विशिष्ट कालावधीनंतर साधनांपासून दूर जावे 
- बंद डोळ्यावर थंड पाणी मारावे 
- शक्य तितक्या दूर अंतरावरून क्रीनकडे पाहावे 
- दर वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी वीस फूट लांबची वस्तू पाहावे 
- वातानुकूलीत पंख्याची हवा चेहऱ्‍यावर येणार नाही याची काळजी घ्या 
- दोन तासानंतर खुर्चीतून उठून शरीराचे हातपाय मान व पाठ मोकळे करावेत 
- सगळ्यांनी रोज आपल्या आवडीचा व्यायाम करावा 
- योगा व प्राणायाम करणे आवश्‍यक आहे 
 

संपादन- भूषण श्रीखंडे