फटाक्यांचे कमी, धुळीचे प्रदूषण अधिक; रंगपंचमीपुर्वी जळगावकरांची ‘धूळ’वड 

सचिन जोशी
Friday, 20 November 2020

शहरातील प्रमुख रस्ते व नागरी वस्त्यांमधील रस्तेही या योजनेच्या कामामुळे खोदून ठेवण्यात आले आहेत. 

जळगाव : शहरात एखादा रस्ता सुस्थितीत दाखवा... अन्‌ हजार रुपये मिळवा, अशी स्थिती आहे. ‘अमृत’ योजनेच्या कामामुळे आणि हे काम नसेल त्याठिकाणचेही रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. खोदलेल्या रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी केल्याने त्यातून प्रचंड धूळ उडत असून, ऐन दिवाळीच्या उत्सवात धूळवडीचा अनुभव आल्याच्या संतप्त भावना जळगावकरांमधून व्यक्त होत आहे. 
जळगावात तीन वर्षांपासून ‘अमृत’चे काम सुरू आहे; परंतु ते अत्यंत संथगतीने होत असल्याने त्याचा त्रास जळगावकरांना होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते व नागरी वस्त्यांमधील रस्तेही या योजनेच्या कामामुळे खोदून ठेवण्यात आले आहेत. 

दिवाळीत खोदकाम 
गेल्या आठवड्यापासून उत्सवचे दिवस होते. सणांचा राजा असलेल्या दिवाळीचा उत्सव आठवडाभर चालला, तो कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या दिवसांत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्याचा दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. 

निकृष्ट दुरुस्ती 
जलवाहिनी टाकल्यानंतर या चाऱ्या बुजण्यात आल्या, मात्र त्यात मुरुम, कच्चा माल टाकण्यात आला. तसेच पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येही माती, मुरुम टाकण्यात आला. मात्र, ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याने त्यातून धुळीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले आहे. रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी गेली, की प्रचंड धूळ उडते. स्वातंत्र्य चौक, नेहरू चौक, टॉवर, शिवाजीनगरातील काही भाग, कानळदा रोड, महाबळकडे जाणारा रस्ता अशा चौफेर रस्त्यांची हीच ‘कहाणी’ आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फटाक्यांचे प्रदूषण कमी, धुळीचे प्रदूषण अधिक अशी स्थिती आहे. 
 
मनपा प्रशासन मस्तीत 
शहराची ही अवस्था झालेली असताना महापालिका प्रशासनाचे ‘अमृत’च्या कामावर अथवा रस्त्यांच्या स्थितीवर कोणतेही नियंत्रण नाही. पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी त्यांच्याच मस्तीत आहेत. नावाला बैठका होतात, त्यात रस्ते दुरुस्तीचे विषय निघतात. तात्पुरती दुरुस्तीही होते, मात्र ती मक्तेदाराच्या हिताचीच असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहराला वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city all road pollution in dust