आधी आजुबाजूच्या घरांच्या लावल्या कड्या...मग केली घरफोडी ! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

चोरट्यांनी कुलूपबंद असलेल्या फ्लॅटला सोडून इतर सातही घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कृष्णकांत यांच्या घरात घरफोडी केली.

जळगाव  : चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी रविराज अपार्टमेंटमधील आजूबाजूच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली. त्यानंतर बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी रामांनदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भुसावळच्या रेल्वे प्रबंधक कार्यालयात अधीक्षक असलेल्या कृष्णकांत येवलकर यांचे आदर्शनगरातील रविराज अपार्टमेंटमध्ये घर आहे. याठिकाणी ते पत्नी भूमिका व मुलगा हर्ष यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. लॉकडाउन असल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून भुसावळ येथे आपल्या आई- वडिलांकडे गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. बुधवारी काही कामानिमित्त येवलकर हे घरी आले आणि सायंकाळी काम आटोपून ते पुन्हा भुसावळला निघून गेले होते. 

चोरट्यांनी लढवली शक्कल 
रविराज अपार्टमेंटमध्ये एकूण आठ फ्लॅट आहेत. चोरट्यांनी कुलूपबंद असलेल्या फ्लॅटला सोडून इतर सातही घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कृष्णकांत यांच्या घरात घरफोडी केली. आज सकाळी पहाटेच्या सुमारास कृष्णकांत यांच्या घरासमोर राहणाऱ्या कुळकर्णी यांना त्यांचा घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तत्काळ कृष्णकांत यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. चोरी झाल्याचे कळताच येवलकर हे तत्काळ जळगावात दाखल झाले व पोलिस ठाणे गाठले. 

असा माल लंपास 
येवलकर याच्या घरातून चोरट्यांनी लहान बाळांच्या 1 ग्रॅमच्या 12 सोन्याच्या अंगठ्या, 2 ग्रॅमच्या 6 सोन्या अंगठ्या, 4 ग्रॅमचे 4 सोन्याचे पदक, चांदीचे कडे यासह सहा ते सात हजार रुपये रोख असा एकूण पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city Theftth robary by hig cllas socity

टॉपिकस