आता ऑक्‍सिजनची कमतरता नाही

देवीदास वाणी
Monday, 30 November 2020

ऑक्सिजन बाहेरील जिल्ह्यात जात नाही ना, याची खातरजमा करून नियंत्रणासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती. त्याचवेळी ऑक्सिजन टँक उभारणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. 
 

जळगाव : जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन टँक उभारून तेथून द्रव स्वरूपात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जाणार आहे. 
दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांना केवळ जिल्हा रुग्णालयालाच ऑक्सिजनचा पुरवठा करा. बाहेरील जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले होते. ऑक्सिजन बाहेरील जिल्ह्यात जात नाही ना, याची खातरजमा करून नियंत्रणासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती. त्याचवेळी ऑक्सिजन टँक उभारणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. 
२० हजार लिटर क्षमतेचा द्रव ओटू टँक उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद येथून हा टँक आणण्यात आला आहे. टँक उंच असल्याने तो औरंगाबाद येथून ट्रॉलीवर आणण्यात आला आहे. तब्बल आठ ते पंधरा दिवसांत टँक उभारला जाणार आहे. 
 
ग्रामीण रुग्णालयात नॉन कोविडची सुविधा 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. यामुळे जिल्ह्यातील तिन्ही उपजिल्हा रुग्णालयांसह सर्व ग्रामीण रुग्णालयांत नॉन कोविड सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. चाळीसगाव येथे पाचोरा, भडगावचे, जामनेर येथे बोदवडचे रुग्ण, तर रेल्वे हॉस्पिटलमधील रुग्णांना डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital develop oxigen tank