
शासकीय रुग्णालयात कोरोना महामारीव्यतिरिक्त इतर व्याधींच्या आजारावर १५ दिवसांपासून उपचार सुरू झाले आहेत. त्यात दंतोपचार विभागदेखील अद्ययावत झाला आहे.
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचाराची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. तोंडाच्या कर्करोगावरदेखील उपचार होणार असून, दंतरुग्णांनी ओपीडी काळात लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय रुग्णालयात कोरोना महामारीव्यतिरिक्त इतर व्याधींच्या आजारावर १५ दिवसांपासून उपचार सुरू झाले आहेत. त्यात दंतोपचार विभागदेखील अद्ययावत झाला आहे. त्यात मौखिक आजार, दातांची तपासणी, दात काढणे, दात बसविणे, रूट कॅनॉलद्वारे दातांचे संरक्षण करणे ही सेवा दिली जात आहे.
माफक दरात दंतोपचार
वयोवृद्ध व्यक्तींच्या दातांच्या कवळ्या, कृत्रिम दात, लहान मुलांच्या दात येण्याबाबतच्या समस्या, अक्कलदाढ काढणे याबाबत तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून सेवा देत आहेत. यात कक्ष क्रमांक २१४ मध्ये ओपीडी काळात सकाळी नऊ ते एकदरम्यान सरकारी माफक दरात दंतोपचार सुरू झाले आहेत. एका वेळी चार रुग्ण तपासणी करण्याची क्षमतादेखील विकसित करण्यात आली आहे.
अद्ययावत सुविधा
तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करणे, उपचार करणे व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणे ही सुविधादेखील अद्ययावत पद्धतीने सुरू झाली आहे. दंतोपचार विभागात प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुराधा वानखडे, डॉ. राखी यादव, डॉ. सतीश सुरळकर, तंत्रज्ञ क्षितिज पवार, सहाय्यक सूर्यकांत विसावे सेवा देत आहेत. दंतोपचार करण्यासाठी लाभार्थी रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे