
एप्रिलच्या १७ तारखेनंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली. तेव्हापासूनच जिल्हा रुग्णालयाला पूर्णपणे कोविड हॉस्पिटल करून नॉन कोविड रुग्णसेवा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग करण्यात आली.
जळगाव : सहा-सात महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णसेवा बंद करत पूर्णपणे कोविड रुग्णालय करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आठवडाभरात पुन्हा ‘नॉन कोविड’ रुग्णसेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालय-रुग्णालयाची मुख्य वास्तू सॅनिटाइझ करून कोरोना कक्ष परिसरातील अन्य वास्तूंमध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
जळगाव जिल्ह्यात २७ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, नंतर दोन दिवसांनी दुसरा रुग्ण दाखल झाला. एप्रिलच्या १७ तारखेनंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली. तेव्हापासूनच जिल्हा रुग्णालयाला पूर्णपणे कोविड हॉस्पिटल करून नॉन कोविड रुग्णसेवा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग करण्यात आली. नंतरच्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या ५० हजारांवर ॲक्टिव्ह रुग्णसंख्येने उच्चांकी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
रुग्णसंख्या घटल्याने दिलासा
सप्टेंबरच्या १७ तारखेनंतर रुग्णसंख्या घटू लागली. संसर्ग नियंत्रणात आल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या नीचांकी चारशेपर्यंत खाली आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. आता डॉ. पाटील मेडिकल कॉलेजला वर्ग केलेली नॉन कोविड सेवा पुन्हा सिव्हिल अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयात सुरू करण्याचे नियोजन होत आहे.
आठवडाभरात निर्णय
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्याने प्रशासन अद्याप सिव्हिलमध्ये नॉन कोविड सेवा सुरू करण्याबाबत साशंक आहे. अतिसंसर्ग काळात सर्व चारशेवर बेड फुल असलेल्या सिव्हिलमध्ये सध्या कोरोनाचे ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे मुख्य इमारतीत नॉन कोविड सेवा सुरू करून परिसरातील अन्य इमारतीत कोविड कक्ष सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. आठवडाभरात हा निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.
योग्य काळजी घेणार
यात सुरवातीला कोरोना कक्ष असलेली संपूर्ण इमारत पूर्णपणे सॅनिटाइझ करण्यात येईल. ज्या ठिकाणी कोरोना कक्ष स्थापन करायचा आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजनसह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी बाहेरून ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे