...तर आजीचा जीव वाचला असता; नातवाने व्यक्त केली भावना

jalgaon civil
jalgaon civil

जळगाव : "अहो डॉक्‍टरसाहेब आजी सापडली का? तुम्ही कोणाला तरी सांगून वॉर्डातील शौचालयांसह इतर ठिकाणी पाहणी करा..' अशी विनवनी केली.. पण, त्यांनी पाहणी देखील केली नाही. तपासणी केली असती तर आजीचा जीव वाचला असता...' अशा शब्दांत मृत वृद्धेचा नातू हर्षल नेहेते याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 
आजीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हर्षलने जिल्हा रुग्णालयातील कारभार, उपचारांबद्दल "सकाळ'शी बोलताना व्यथा मांडली. "गेल्या काही दिवसांपूर्वी सुरवातीला वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आई व आजीला क्‍वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले होते. परंतु याठिकाणी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्या दोघांना 31 मेस कोविड सेंटरमध्ये दाखल केले. आईची प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटर लावण्यासाठी ती वॉर्डाबाहेर बसलेली होती. परंतु व्हेंटिलेटरच नसल्याने तिचा रात्रीच्या सुमारास उपचाराअभावी मृत्यू झाला. त्या दिवशी आईला व्हेंटिलेटर मिळाले असते तर आई जिवंत राहिली असती. माझी आई गेल्याचे दु:ख पेलत असतानाच आज आजीही गेल्याचे कळताच आमच्यावर आणखीच दु:खाचा डोंगर कोसळला...' हर्षल सांगत होता. 

आईही पडली होती बाथरूममध्ये 
भुसावळातील क्‍वारंनटाइन सेंटरमध्ये आई आणि आजीला दाखल केले. परंतु तीन दिवसांत याठिकाणी देखील त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास आई काही तास बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे सांगताना त्या तरुणाचा कंठ दाटून आला होता. 

.. तिकडे पत्नी गरोदर 
त्या वृद्धेचा नातू हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला असून, त्याठिकाणी तो पत्नीसोबत वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपचाराअभावी आईचा मृत्यू झाला. वडीलही नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल आहेत. आज आजीचा देखील मृत्यू झाला असून, माझी पत्नी 9 महिन्यांची गरोदर आहे. सर्व संकटे एकाचवेळी आल्याने मी हतबल झालो असल्याचे त्या तरुणाने सांगितले. 

नावामुळे झाला घोळ 
संशयित रुग्ण म्हणून दाखल करताना भुसावळ येथील एका अधिकाऱ्याने त्या वृद्ध महिलेचे नावात चूक केली. त्यानंतर जळगावात देखील त्याच नावाने रुग्णाची नोंदणी करण्यात आली होती. वृद्ध महिलेची नातेवाइकांकडून चौकशी केली असता त्यांना या नावाची महिलाच रुग्णालयात नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नावामुळे काही दिवस गोंधळ देखील सुरू होता. 

पोलिसही बोलले खोटं 
तक्रार दाखल केल्यानंतर मी संबंधित पोलिसांसोबत बोललो. आम्ही त्या वॉर्डासह रुग्णालयाचा संपूर्ण परिसरात आजीचा शोध घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, आज आजीचा मृतदेह त्या वॉर्डामधील शौचालयात आढळून आल्याने डॉक्‍टरांसह पोलिसही आमच्याशी खोटं बोलल्याचे सिद्ध होत आहे, असेही हा तरुण म्हणाला. 

आता तरी रुग्णांवर उपचार करा 
माझ्या आई, आजीला उपचार मिळाले नाहीत. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्या दोघी आमच्यातून निघून गेले. मात्र, आता तरी डॉक्‍टरांनी जबाबदारीने इतर रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान द्यावे. अशी कळकळची विनंती त्याने "सकाळ'शी बोलताना केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com