esakal | सोहळ्यांना ‘चार चाँद’ लावणाऱ्यांचे आयुष्य बेरंग 

बोलून बातमी शोधा

सोहळ्यांना ‘चार चाँद’ लावणाऱ्यांचे आयुष्य बेरंग 

जळगाव शहरात अशा प्रकारच्या थीमवर काम करणारे चार-पाच आर्टिस्ट आहेत. स्टेज डेकोरेटरचे काम करणारी टीमही वेगळी असते.

सोहळ्यांना ‘चार चाँद’ लावणाऱ्यांचे आयुष्य बेरंग 
sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव  : लग्नसोहळे, समारंभांमध्ये स्टेज डेकोरेशनसह मंडप सजावट साकारत या सोहळ्यांना ‘चार चाँद’ लावणाऱ्या कलावंतांसह त्यांच्या टीममधील कामगारांच्या आयुष्याचा कोरोना व लॉकडाउनने बेरंग केला आहे. कोरोना व लॉकडाउनमुळे सलग दुसऱ्या वर्षी लग्नसोहळे, समारंभांवर गंडांतर आले आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचा रोजगार बुडून उपासमारीची वेळ येऊन ठेपली. 

सजावटीचे शिल्पकार 
गेल्या काही वर्षांत लग्नसोहळे, समारंभ, पार्ट्यांची संकल्पनाच बदलली आहे. ती बदलली आहे या सोहळ्यांना आपल्या आकर्षक सजावटीच्या संकल्पनांनी ‘चार चाँद’ लावणाऱ्या कलावंतांनी. हे सोहळे वेगवेगळ्या थीमवर आधारित सजविले जातात. स्टेजची पृष्ठभूमी म्हणजे बॅकड्रॉपचे डिझाइन, आजूबाजूचे कव्हर, मंडपाचे डेकोरेशन, पडदे, त्यांचे रंग, त्यांना असलेली झालर, विविध विधींसाठी वेगवेगळी थीम असे प्रकार सोहळ्यांमध्ये रंगत आणतात. ही सर्व कलाकुसर साकारतात कलावंत व त्यांच्यासोबत काम करणारी टीम. अशा प्रकारच्या युनिक, अल्टिमेट थीम साकारणाऱ्या कलेचे खरेतर मोल नसते. 

कलावंत रस्त्यावर 
या संकल्पना साकारणारे कलावंतच आज लग्न सीझन लॉक झाल्याने रस्त्यावर आले. वर्षभरात शेकडो प्रकारची कामे त्यांना मिळत असतात. अगदी पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, वडोदरा येथील कामेही या कलावंतांनी केली आहेत. मात्र, वर्षभरापासून ही कामेच बंद झाली आहेत. जळगाव शहरात अशा प्रकारच्या थीमवर काम करणारे चार-पाच आर्टिस्ट आहेत. स्टेज डेकोरेटरचे काम करणारी टीमही वेगळी असते. या सर्वांनाच लॉकडाउनचा फटका बसला आहे. 

कोटींची उलाढाल ठप्प 
केवळ स्टेज, मंडप डेकोरेशन, थीमनुसार सजावट आदी बाबींचे नियोजन करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. या घटकांवर अन्य सुतार, वेल्डिंगची टीमही अवलंबून असते. त्यांच्यावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, या इंडस्ट्रीत कोट्यवधींची उलाढाल करणारा हा घटकही वर्षभरापासून अडचणीत आहे. 

गेल्या वर्षी व सलग यंदाही जी कामे मिळाली ती सर्व रद्द करण्याची वेळ आली. आमच्यासह सोबत काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. शासनाने सोहळ्यांना किमान १०० ते २०० लोकांसह उपस्थिती देण्याची गरज आहे, अन्यथा उपासमारीनेच लोक मरतील. 
-राजेश नाईक (आर्टिस्ट)