भांडणे मिटवून तुमची किंमत तूम्हीच वाढवा; मंत्री ठाकूर यांचा पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या 

कैलास शिंदे
Saturday, 28 November 2020

कुणापुढेही झुकायच नाही, अगदी निवडणुका आल्यानंतर चर्चेत तुम्ही हक्काच मागितलच पाहिजे. नाही मिळाल तर स्वबळावर लढून यश मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे.

 
जळगाव : मला रडणे आवडत नाही, पदाधिकाऱ्यांनी आपसातील भांडणे मिटवून आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. तुमची किंमत तुम्हीच वाढविली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही वागलात तर तुम्हाला रडत बसायची वेळ येणार नाही, बाहेरचा कोणीही न येता तुमचा हक्क तुम्ही मिळवाल अशा कानपिचक्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व कॉंग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. 

आवश्य वाचा- पुन्हा सत्ता न आल्यामुळे फडणवीस अस्वस्थ - ॲड. यशोमती ठाकूर 

कॉंग्रेस भवनात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदयाल, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते. ॲड. ठाकूर म्हणाल्या, कॉंग्रेस बळकट करण्यासाठी राज्यातील नेत्यांनी यावे असे तुम्ही म्हणता परंतु अगोदरच तुम्हीच का लढण्यास सज्ज् होत नाही. तुम्ही ठरवील पाहिजे, आणि तुम्ही ठरवील तर काहीही करू शकता. तुम्ही कुणापुढेही झुकायच नाही, अगदी निवडणुका आल्यानंतर चर्चेत तुम्ही हक्काच मागितलच पाहिजे. नाही मिळाल तर स्वबळावर लढून यश मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे. 

जिल्ह्याच्या संपर्कमंत्री व्हा : आ. चौधरी 
आमदार शिरीष चौधरी यावेळी म्हणाले, मंत्री यशोमती ठाकूर या अभ्यासू आणि लढवय्या आहेत. त्यांची प्रशासनावर चांगली कमांड आहे. जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट करण्यासाठी त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाच्या संपर्कमंत्री व्हावे, त्यांच्या नेतृत्वाची जिल्हाला गरज आहे. असे आवाहनही त्यांनी केले. 

जि. प. निवडणुकीत जबाबदारी : डॉ.उल्हास पाटील 
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस कमकुवत असल्याचे सांगत प्रत्येक निवडणुकीत मित्र पक्ष आपल्याला कमी जागा देत असतात. जागा वाटपात वरिष्ठही ते मान्य करतात, मात्र आता जिल्हा कॉंग्रेस ते सहन करणार नाही. प्रत्येक निवडणुकीत मित्र पक्षाबरोबर बरोबरीचा हिस्सा मागण्यात येईल. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष ५० टक्के जागावर आपला हिस्सा मागेल, या जागा वाटपात बोलण्याची जबाबदारी श्रीमती ठाकूर यांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon congress meeting minister yashmoti thakur tips by congress dispute between the office bearers