esakal | कंटेन्मेंट झोन'च ठरताय घातक...जळगाव शहरातील "कोरोना'बाधितांचा आकडा साडेतीनशेवर
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेन्मेंट झोन'च ठरताय घातक...जळगाव शहरातील "कोरोना'बाधितांचा आकडा साडेतीनशेवर

सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिक सर्रासपणे फिरत असल्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी, या भागांत रुग्णसंख्या आणखी वाढत आहे.

कंटेन्मेंट झोन'च ठरताय घातक...जळगाव शहरातील "कोरोना'बाधितांचा आकडा साडेतीनशेवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : शहरातील बहुतांश भागात "कोरोना'बाधित रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांकडून कंटेन्मेंट झोनच्या (प्रतिबंधित क्षेत्र) नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने या ठिकाणीच "कोरोना'बाधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी, कंटेन्मेंट झोनच घातक ठरत असल्याची परिस्थिती आहे. 

शहरातील बहुतांश भागात "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे हे भाग "कंटेन्मेंट झोन' घोषित केले जात आहेत. या भागासाठी शासनाने नियमावली केली आहे. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिक सर्रासपणे फिरत असल्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी, या भागांत रुग्णसंख्या आणखी वाढत आहे. आज आढळून आलेले 19 रुग्ण कंटेन्मेंट झोनमधीलच असल्याने काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे, अन्यथा "कोरोना'चा विस्फोट होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

"मनपा'कडून हलगर्जी 
नवीन भागात रुग्ण आढळून आला तो कंटेन्मेंट झोन घोषित करणे आवश्‍यक आहे. परंतु महापालिकेकडून त्या रुग्णाचे केवळ घरच सील केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून परिसर "सील' करण्यास हलगर्जी केला जात असल्याची परिस्थिती शहरात दिसून येत आहे. 

..या भागात आढळले रुग्ण 
शहरातील बहुतांश भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित आहे. आज शहरात मेहरुण परिसरात 1, सद्‌गुरू कॉलनी 2, सिंधी कॉलनी 3, नवल कॉलनी 1, इकबाल कॉलनी 4, शिवाजी नगर 1, अक्‍सानगर 1, जुने बीजे मार्केट 1, लक्ष्मीनगर 1 यासह शहरातील इतर 4 ठिकाणी रुग्ण आढळून आले आहे. 

पाच "फिव्हर क्‍लिनिक' 
महापालिकेच्या दवाखाना विभागाकडून शहरात पाच ठिकाणी फिव्हर क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला व श्‍वास घेण्यास अडचण ही लक्षणे असल्यास तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर मोठे आजार, शस्त्रक्रिया झालेल्या असल्यास त्यांनी देखील फिव्हर क्‍लिनिकमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आवाहन दवाखाना विभागातर्फे करण्यात आले आहे. 

...या ठिकाणी होणार तपासणी 
शहरातील शिवाजीनगरात (कै.) दा. बी. जैन रुग्णालय, सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय, मेहरुण परिसरातील म. मो. मुलतानी दवाखाना, शनिपेठेतील शाहीर अमर शेख दवाखाना याठिकाणी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडपर्यंत तर शाहूनगरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत नागरिकांनी तपासणीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

loading image