लॉकडाउन संपताच लॅपटॉप, मोबाईलचे मार्केटने या कारणाने घेतली उसळी 

देविदास वाणी
Thursday, 30 July 2020

आत्तापर्यंत अँड्रॉइड फोन, लॅपटॉपची विक्री वाढली आहे. पालक दुकाने बंद असताना ऑनलाइन खरेदीवर भर देत होते. आता तर शहरातील मोबाईलची दुकाने सर्रास खुली असल्याने त्यावर मोबाईल खरेदीसाठी गर्दी होत आहे.

जळगाव : विद्यार्थ्यांना आपण मोबाईल, टीव्ही जास्त वेळ पाहू देत नाही. डोळ्यांना चष्मा लवकर लागेल अशी भीती असायची. मात्र कोरोनाने विद्यार्थ्यांचे जगच बदलवून टाकले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपण मोबाईल पाहू देत नव्हतो तेच विद्यार्थी आता तासन् तास ऑनलाइन अभ्यास करत आहेत. अँड्रॉइड फोन प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामुळेच १ जूनपासून आत्तापर्यंत अँड्रॉइड फोन, लॅपटॉपची विक्री वाढली आहे. पालक दुकाने बंद असताना ऑनलाइन खरेदीवर भर देत होते. आता तर शहरातील मोबाईलची दुकाने सर्रास खुली असल्याने त्यावर मोबाईल खरेदीसाठी गर्दी होत आहे. 
कोरोनाने वेगळी जीवनशैली प्रत्येकाला आत्मसात करायला लावली. त्यातून शालेय विद्यार्थीही सुटले नाहीत. शाळा नाहीत. मात्र घरबसल्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन शिक्षण सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्लिश स्कूलतर्फे देण्यास मेमध्येच सुरवात झाली. जूनच्या मध्यानंतर आता या शाळांप्रमाणेच ऑनलाइन शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळांनी देणे सुरू केले आहे. सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन होतेच. मात्र अभ्यासक्रम तीन ते चार तास शिकविला जात असल्याने त्यांनी पाल्यांना स्वतंत्र फोन घेऊन दिले. लाॅकडाउन असताना ऑनलाइन बुक करून मोबाईल मागविले गेले. मोबाईल छोटा पडताे म्हणून काहींनी मोबाईल टॅबची खरेदी केली, तर काहींनी पुढील शिक्षणालाही कामा येईल म्हणून लॅपटॉप खरेदी केले. आताही खरेदी सुरूच आहे. 
पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत अँड्रॉइड फोन, टॅब, तर वीस हजारांपासून तीस हजारांपर्यंत लॅपटॉप बाजारपेठेत उपलब्ध आहे. शहरातील गोलाणी मार्केट मोबाईल मार्केट आहे. सोबतच इतर ठिकाणच्या मोबाईल शोरूममध्येही ग्राहकांची गर्दी होताना दिसते. 
 
मोबाईलला कोरोनोच्या अनलॉकनंतर मागणी वाढली आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर ग्राहकही खरेदी करतात. विशेषतः मोठ्या आकाराच्या अँड्रॉइड फोनला मागणी असते. महापालिकेने मार्केटमधील दुकानांना काउंटरवर खरेदीस लवकरात लवकर परवानगी द्यावी. 
- दीपक संगतानी, मोबाईल विक्रेता 

 

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona lockdown mobile laptop market up in online education