जळगाव शहरासाठी २८२ ऑक्सिजन बेडची वाढ 

देविदास वाणी
Wednesday, 16 September 2020

जळगावसाठी ५० डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. हे नवीन डॉक्टर नियुक्त झाल्यास आरोग्य यंत्रणा सक्षम होईल.

 
जळगाव  ः दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात रुग्ण उशिरा येत असल्याने ऑक्सिजनची गरज अधिक रुग्णांना भासू लागली आहे. अशा स्थितीत जिल्हा कोविड रुग्णालय, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयासह खासगी मान्यता प्राप्त कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड काहीअंशीच शिल्लक आहेत. यावर पर्याय म्हणून २८२ ऑस्किजनयुक्त बेड‌ तयार ठेवण्यात आले आहेत. 

सध्या शहरात ऑक्सिजनवर असलेले १५०० रुग्ण उपचार घेत असून, एकूण बेडची संख्या अवघी १९४७ आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता ही बेडसंख्या कमी पडण्याची शक्यता पाहता आणखी ४०० ते ५०० ऑक्सिजन युक्त बेड तयार करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी आजच्या स्थितीत नवीन ३८० बेड तयार ठेवण्यात आले आहेत. सध्या जिल्हा कोविड रुग्णालयात सध्या ३५६ बेड‌ असून, यात आणखी २०० बेड वाढविले जाणार आहेत. यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयातील बेडची क्षमता ५०० वर जाणार आहे. जसजशा कोरोना चाचण्या वाढतील, तसतशी रुग्णसंख्या वाढेल. जे रुग्ण उपचारासाठी लवकर येतील, त्यांना ऑक्सिजनची गरज भासणार नाही. जे त्रास अधिक झाल्यानंतर आले, त्यांना ऑक्सिजनयुक्त बेडची गरज भासेल. हे गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. शासनाने १६४३ नवीन डॉक्टरांना नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यात जळगावसाठी ५० डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. हे नवीन डॉक्टर नियुक्त झाल्यास आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. किती डॉक्टर मिळतील याकडे सध्या लक्ष लागून आहे. 

नवीन उपलब्ध बेड 
डीआयसी हॉल ः ५० 
ओपीडी कक्ष ः ५२ 
वेअरहाउस ः ८० 
इकरा कॉलेज ः १०० 

एकूण बेड ः २८२ 

कोरोनाबाधित रुग्णांनी न घाबरता लागलीच कोविड रुग्णालयात दाखल व्हावे. ऑक्सिजनयुक्त बेडची गरज असली, तरी घाबरून जाऊ नये. आरेाग्य यंत्रणा रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेड पुरविण्यास सक्षम आहे. 
- डॉ. एन. सी. चव्हाण 
जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient grows, so does the bed administration at the Covid Center