महिना उलटला तरी जळगाव जिल्ह्याचा‘ॲन्टिबॉडी’चा अहवाल आला नाही !

देविदास वाणी
Monday, 28 September 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे? हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो.

 जळगाव  : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना ‘ॲन्टिबॉडी’ तयार झाल्या किंवा नाही, याच्या तपासणीसाठी केंद्राच्या पथकाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन चारशे जणांचे रक्ताचे ‘सॅम्पल’ (सिरो सर्व्हे) घेतले होते. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. महिला उलटला तरी अहवाल न आल्याने ‘सॅम्पल’ घेतलेल्या नागरिकांमध्ये ‘ॲन्टिबॉडी’चे प्रमाण किती? हे समजण्यास उशीर लागणार आहे. या ‘सॅम्पल’ची तपासणी चेन्नई, नवी दिल्ली येथील संस्थांमध्ये सध्या सुरू आहे. 

केंद्रीय पथकाने जिल्ह्यात महिनाभरापूर्वी फिरून विविध ठिकाणी ‘सिरो सर्व्हे’ केला. त्यात वॉर्ड ५७ (जळगाव महापालिका), वॉर्ड २८ (चाळीसगाव), वॉर्ड ४ (भुसावळ), मोहराळे (ता. यावल), तांदलवाडी (ता. रावेर), कडगाव (जळगाव), धरणगाव, वरखेडे (ता. भडगाव), नाईकनगर (ता. पाचोरा), गोराडखेडा (ता. जामनेर) या ठिकाणच्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने (सॅम्पल) घेतले आहेत. पथकाबरोबर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, लॅब टेक्निशियन, सहाय्यक आरोग्यसेविका होती. पथकात निरीक्षक म्हणून डॉ. तासखेडकर, डॉ. मोरे, डॉ. तडवी होते. 

 

‘कोरोना’च्या टक्केवारीसाठी सर्व्हे 
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे? हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो. व्यक्तीच्या रक्तद्रवामधील ‘ॲन्टिबॉडी’चा शोध याद्वारे घेतला जातो. 

 

ऑक्सिजन बेड्‍सचे आज लोकार्पण 
जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डांत ऑक्सिजन बेड्‍स तयार करण्याचे काम सुरू होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात ३५६ बेड्‍स ऑक्सिजनयुक्त आहेत. मात्र, दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणी १८० ऑक्सिजन बेड्‍सनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सोमवारी (ता. २८) सकाळी अकराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बेड्‍सचे लोकार्पण होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित राहतील. 
 
केंद्रीय पथकाने तपासण्या केलेल्या नागरिकांमध्ये ‘ॲन्टिबॉडी’चे प्रमाण किती वाढले? याचा ‘सिरो’ सर्व्हे अद्याप आलेला नाही. कदाचित अजून काही दिवसांनी येईल किंवा केंद्रीय पथकाने त्यांच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा सर्व्हे कसा केला जातो, याबाबत प्रशिक्षण मिळण्यासाठी हा सर्व्हे केला असेल. 

डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient jalgaon district aunty did not get the same body report even after months