पित्‍याला अग्‍निडाग...दुःख बाजूला सारत इंजेक्‍शन केले सुपूर्द अन्‌ दोन्ही भावांचे वाचला कोरोनातून जीव 

सचिन जोशी
Monday, 20 July 2020

प्रत्येक घटक तितक्याच तळमळीने इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करतो.. कोरोनाने बळी गेलेल्या रुग्णाचे मित्र, त्याचा मुलगा पित्याचे दु:ख बाजूला सारत इंजेक्शन उपलब्ध करुन देतो.. डॉक्टरही प्रयत्नांची शर्त करतात अन्‌ दोघा गंभीर अवस्थेतील भावांचा जीव वाचतो..

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल कोरोनाग्रस्त रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होतात.. त्यातून तातडीने हव्या असलेल्या इंजेक्शनचा शोध, ते मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची एका मालिका बनते.. आणि या मालिकेतील प्रत्येक घटक तितक्याच तळमळीने इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करतो.. कोरोनाने बळी गेलेल्या रुग्णाचे मित्र, त्याचा मुलगा पित्याचे दु:ख बाजूला सारत इंजेक्शन उपलब्ध करुन देतो.. डॉक्टरही प्रयत्नांची शर्त करतात अन्‌ दोघा गंभीर अवस्थेतील भावांचा जीव वाचतो.. 
कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात सर्वत्र निराशेचे वातावरण असताना मानवतेचे दर्शन घडविणारे असे अनुभवही जगण्याची प्रेरणा देतात, आणि सेवाभावाचा संदेश देत नवी ऊर्जाही निर्माण करतात. ‘सकाळ’मधील पत्रकार शिवाजी जाधव यांच्याबाबत घडलेला हा प्रकार. त्यांच्या धाकट्या भावाला (सचिन) कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यावर ‘न्यूमोनिया’ची पाश्‍र्वभूमी असलेल्या त्या कुटुंबाचे होशच उडाले. थोरल्या भावाला याच आजाराने हिरावलेले, त्यामुळे टेंशन अधिकच. त्यातही हा धाकटा भाऊ, कोरोनाचे इन्फेक्शनही थेट फुफ्फुसापर्यंत. भावाच्या उपचाराची लाइन लागत नाही, तोच जाधव यांचाही अहवाल पॉझिटिव्ह. कुटुंबातील अन्य चार जणही बाधित, सुदैवाने त्यांना लक्षणे नाहीत. अशा स्थितीत आधी धाकट्या भावाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरु होते. 

रुग्णालयाची तत्पर टीम 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात दाखल या रुग्णावर डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. केतकी, डॉ. वैभव या दांपत्याच्या निगराणीखाली उपचार सुरु होतात. अत्यंत दुर्मिळ व महागडे ‘अक्टीमेरा’ इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली जाते..फार्मासिस्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या प्रयत्‍नातून..इंजेक्शन मिळते, आणि सचिन जाधव यांच्यावरील धोका टळतो.. रुग्णालयातील ही टीम याच नव्हे तर अशा अनेक केसेससाठी शर्तीचे प्रयत्न करतेय.. त्यांना समाजातील सहकार्याची गरज आहे.. 

.. मानवतेच्या साखळीचे प्रयत्न 
तोवर शिवाजी यांचीही प्रकृती खालावत असते. त्यांनाही मार्केटमध्ये उपलब्ध न होणारे रेमडेसीव्हर इंजेक्शन गरजेचे. हे सहा इंजेक्शन मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरु होतात. मेडिकल कॉलेजला जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणारे वर्गमित्र असलेले राहुल कुळकर्णी यांचा खटाटोप. कुठूनतरी चाळीसगावचा संदर्भ मिळतो, तेथील रुग्ण संजय कोठावदे यांच्यासाठी हे इंजेक्शन हवे होते. त्यांच्यासाठी नाशिकमधून हे इंजेक्शन मिळविले जाते. परंतु, तोवर कोठावदेंचा दुर्दैवी मृत्यू होतो. कोठावदेंचे मित्र दिलीप सोनवणे, रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध असल्याचे कळते. राहुल कुळकर्णी सोनवणेंशी संवाद साधतात.. सोनवणे कोठावदेंच्या मुलाशी बोलतात.. मुलगा पित्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारत इंजेक्शन लगेच देण्याचे सांगतो. एकीकडे पित्याला अग्निडाग देताना अंकीत दुसरीकडे अन्य रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्याजवळील इंजेक्शन जाधव यांचे अन्य दोघा सहकाऱ्यांच्या हाती सुपूर्द करत असतो.. अशी ही साखळी. 

मित्र गमावला.. अन्‌ कमावलाही! 
बाजारात रेमडेसीव्हरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु.. अशा स्थितीत अंकीत कोठावदे आहे त्या दरात हे इंजेक्शन देतो.. पुढच्या आणखी चार इंजेक्शनचीही व्यवस्था होते, आणि जाधवांचा जीव वाचतो. गजानन मालपुरेंसारखे कार्यकर्ते याकामी आपले योगदान देतात.. या संपूर्ण घटनाक्रमात चाळीसगावचे लोक त्यांचा एक जवळचा मित्र (संजय कोठावदे) गमावतात.. मात्र, या रुग्णाचा मुलगा व मित्र त्यासाठी आणलेले इंजेक्शन उपलब्ध करुन देत दुसऱ्या एका मित्राचा जीव वाचवितात.. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona positive father death and Injection handover two brother