कोरोनावरील रेमडेसिवर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळा बाजार 

सचिन जोशी
Monday, 21 September 2020

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. दररोज आठशे- हजार रुग्ण वाढत असून गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरसह टॉसलीझुमॅब, रेमडेसिवर, ॲक्टीमेरा यासारख्या उपयुक्त व महागड्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.

जळगाव : कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असताना गंभीर रुग्णांसाठी आवश्‍यक रेमडेसिवर व अन्य इंजेक्शनचा जिल्ह्यात काळा बाजार सुरु झाल्याचे दिसत आहे. आधीच या इंजेक्शनचा तुटवडा असताना छापील किमतीपेक्षा दुप्पट दराने बिल न देता त्याची विक्री होऊ लागली आहे. पारोळ्यातील एका मेडिकलची यासंदर्भा तपासणी केली असता शंभर इंजेक्शनची बिलाविना विक्री केल्याचा प्रकार समोर आला असून या दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. दररोज आठशे- हजार रुग्ण वाढत असून गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरसह टॉसलीझुमॅब, रेमडेसिवर, ॲक्टीमेरा यासारख्या उपयुक्त व महागड्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. पुरवठा कमी व मागणी जास्त, यातून या इंजेक्शनचा काळाबाजारही सुरु झाल्याचे बोलले जात आहे. 

राज्यभरात हीच स्थिती 
संपूर्ण राज्यात रेमडेसिवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यातूनच काळा बाजारही होत असल्याचे चित्र आहे. एकेक इंजेक्शन छापील किंमतीपेक्षा दीडपट, दुप्पट दराने बिल न देता विक्री होत आहे. ज्यांना याप्रकारची इंजेक्शन लिहून दिली आहेत, त्या रुग्णांचे नातलग या इंजेक्शनसाठी दारोदारी भटकंती करत आहेत. अगदी नाशिक, पुणे, अकोला, अमरावती, सुरत, बडोद्यापर्यंत संपर्क सुरु आहे. तरीही, इंजेक्शन मिळत नाहीत, अशा तक्रारी समोर येत आहेत. 

अनधिकृत विक्रीचे प्रकार 
रेमडेसिवर केमिस्टकडे उपलब्ध नसताना बाजारपेठेत काही ठिकाणी अनधिकृतपणे त्याची विक्री सुरु असल्याचेही निदर्शनास येत आहे. काही व्यक्ती गरजवंत रुग्णाकडे त्याचे आधारकार्ड, कागदपत्र मागून रेमडेसिवर उपलब्ध करुन घेतात व त्यानंतर इंजेक्शन उपलब्ध होत नाही, असे सांगत दुसऱ्याच रुग्णांना ते वाढीव दराने विकतात, असा प्रकारही समोर येत आहे. कोविड उपचारासाठी परवानगी दिलेल्या काही खासगी हॉस्पिटलमध्येही रेमडेसिवर उपलब्ध असताना ते अन्यत्र दिले जात नाही, अशा तक्रारी येत आहेत. 

पारोळ्याच्या मेडिकलवर कारवाई 
काही मेडिकल दुकानांवर या इंजेक्शनचा काळा बाजार सुरु आहे. त्यासंदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याची गंभीर दखल घेत कारवाई सुरु केली आहे. याअंतर्गत पारोळ्यातील राजमुद्रा मेडिकलची तपासणी केली असता २ व १० सप्टेंबरला प्रत्येकी ५० अशा १०० रेमडेसिवर इंजेक्शनची बिलेच या मेडिकलवर उपलब्ध नाहीत. त्याआधारे मेडिकल संचालकास कारणे दाखवा नोटीस बजावली असून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे. 
 
१७ हजार इंजेक्शनचा पुरवठा 
राज्यातही रेमडेसिवरचा तुटवडा आहे. त्यासाठी सिप्ला कंपनीने पाठविलेल्या साठ्यात महाराष्ट्रासाठी १७ हजार व्हायल्स आहेत. त्याचे वितरण सुरु झाले असून दोन दिवसांत जळगाव जिल्ह्यात काही स्टॉक येणार आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकेल. 
 
रेमडेसिवरचा तुटवडा आहे, परंतु तक्रारीनंतर काही जणांना ते तातडीने उपलब्ध करुन दिले आहे. येत्या दोन दिवसांत नवीन साठा येणार असून त्यामुळे रुग्णांची सोय होईल. मात्र, चढ्या दराबाबत कुणी रेमडेसिवर अथवा अन्य कुठलेही इंजेक्शन विकत असेल तर रुग्ण, त्यांच्या नातलगांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. 
- डॉ. अनिल माणिकराव (निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona remdesivir injection start black market in hospital