कोरोना हरतो रे भाऊ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

कोविडची आम्हाला जाणवलेली लक्षणे : ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, कोरडा खोकला, घशात खवखवणे, शरीरावर खाज येणे. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टही तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुमचा व्हायरल लोड किती आहे हे कळते. 
 

तारीख २२ ऑगस्ट... घरात गणपतीची तयारी सुरू होती; पण माझ्या मनाची आतल्या आत घालमेल सुरू होती. सर्व काही झाल्यावर मी दुपारी झोपले तेव्हा चेहरा आणि मान गरम लागत होती. आम्हाला वाटलं वायरल फिव्हर असेल. पण, गौरी आगमनाच्या दिवशी माझ्या दोन्ही कन्या मिहिका व म्रिगांकालाही ताप आला. रात्री पप्पांनाही ताप आला. या अगोदर दोन दिवसांपूर्वी राहुलनाही ताप येऊन गेला; पण त्यावेळेस आम्हाला वाटलं, की दातांची रूट कॅनॉल ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे थोडी कणकणी असावी. सर्वांचे हे आजारपण बघून आता आपण कोविड टेस्ट करावी का, म्हणून मी माझी मैत्रिण डॉ. क्षमाबरोबर बोलले. तसेच आमचे फॅमिली फ्रेंड डॉक्‍टर नितीन जाधव यांच्या सल्ल्यानुसार आम्ही कोविडच्या आणि ब्लडच्या सर्व चाचण्या केल्या. आम्ही सर्वप्रथम रॅपिड ऍन्टीजेन स्वॅब टेस्ट केली. पाच-सहा तासांत आम्हाला समजलं, की आम्ही सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह आहोत. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पप्पांचं वय ८२ व म्रिगांका ११ वर्षांची असल्यामुळे सर्वजण टेन्शनमध्ये होतो. सुदैवाने आमच्या रिपोर्टसमध्ये इन्फेक्‍सन कमी प्रमाणात असल्यामुळे सर्वांना होम क्वारंटाइन ट्रिटमेंट सुरू झाली. 
कोविडची आम्हाला जाणवलेली लक्षणे : ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, कोरडा खोकला, घशात खवखवणे, शरीरावर खाज येणे. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टही तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुमचा व्हायरल लोड किती आहे हे कळते. 
चेस्टचं सीटी स्कॅनही करणे आवश्‍यक आहे. कारण त्यावरून तुम्हाला इन्फेक्‍शन किती आहे, हे कळते. हे सर्व डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून त्वरित करावे म्हणजे तुमची लाइन ऑफ ट्रिटमेंट ठरते. 

...अशी घ्यावी काळजी 
- ऍन्टीबायोटिक व अँटी व्हायरल, व्हिटॅमिन सी आणि डी गोळ्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात 
- दूध हळद, सुका मेवा, ताजी फळे, अंडी, चिकन, मटण व हाय प्रोटीन डाएट घ्यावीत 
- शाकाहारी असल्यास : सोया दूध, कडधान्य, पनीर, पालेभाज्या असा सकस आहार घ्यावा 
- सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे. यामध्ये तुम्हाला धाप लागते का, हे पाहावे 
- दिवसातून ३-४ वेळा वाफारा घेणे, गरम पाणी घ्या, सुंठ पूडचा वापर करावा 
- डायबेटिक, हार्ट, कॅन्सर पेशेंट असाल तर डॉक्‍टरांच्या परवानगीशिवाय कुठलीही औषधे घेऊ नका 
- कायम मन सकारात्मक ठेवा. त्यातूनच तुमचा निम्मा आजार बरा होतो 

लढण्याची धमक बाळगा
घरी असल्याने आम्ही कामे वाटून घेतली. कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वांत मोठा आशीर्वाद आहे, या काळात आम्ही सर्व जण एकमेकांना जपत होतो. एकत्र जेवत होतो. सुदैवाने आमच्या मित्र-मैत्रिणींनी व नातेवाईकांनी नाष्टा व जेवण पाठवायला सुरवात केली. खरोखर अशा परिस्थितीत त्यांचा एक आपुलकीचा फोन व प्रेम पाहून मन भारावून जायचं. २१ दिवसांनंतर देवाच्या व डॉक्‍टरांच्या कृपेने आम्ही सर्व जण खुशाल आहोत. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक बाळगा. तुम्हीही कोरोनावर मात करू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus chavan family triatment and corona free