काहीसा दिलासा : जळगाव जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले जास्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

जवळपास तीन आठवडे, महिनाभरापासून दररोजच्या रुग्णांची संख्या पाच- सातशेच्या वर, अगदी हजारापेक्षाही अधिक होती. सोमवारी इतक्या दिवसांनंतर प्रथम दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या आत राहिला.

जळगाव : बऱ्याच दिवसांनंतर सोमवारी (ता. १४) जिल्ह्याला नव्या बाधितांच्या संख्येत दिलासा मिळाला. दिवसभरात ४५१ रुग्ण आढळून आले. त्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या ७१२ होती. मात्र, चिंता वाढविणारा आकडा मृत्यूंचा असून, १९ मृत्युंसह एकूण बळींचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर पोचला आहे. 
गेल्या जवळपास तीन आठवडे, महिनाभरापासून दररोजच्या रुग्णांची संख्या पाच- सातशेच्या वर, अगदी हजारापेक्षाही अधिक होती. सोमवारी इतक्या दिवसांनंतर प्रथम दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या आत राहिला. सोमवारी प्राप्त अहवालांनुसार दिवसभरात केवळ ४५१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३९ हजार २८७ पर्यंत पोचली. दुसरीकडे सोमवारी दिवसभरात बरे झालेल्या ७१२ रुग्णांसह एकूण बरे झालेल्यांची संख्या २८ हजार ४६१ झाली आहे. 

पुन्हा १९ मृत्यू 
गेल्या २४ तासांत पुन्हा १९ रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे. आजच्या आकड्यामुळे एकूण बळींची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर म्हणजे ९९० वर पोचली आहे. जळगाव शहर व तालुक्यात प्रत्येकी ४ असे सोमवारी आठ मृत्यू झाले. यात ४१ वर्षीय तरुणाव्यतिरिक्त उर्वरित १८ रुग्ण हे ५०-६० वर्षांवरील आहेत. 
 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १९, भुसावळ ४८, अमळनेर ६६, चोपडा ६७, पाचोरा ७, भडगाव ५, धरणगाव १९, यावल २, एरंडोल १८, जामनेर १०, रावेर ६, चाळीसगाव ८२, मुक्ताईनगर १०, बोदवड ६, अन्य जिल्ह्यातील ७. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus update more cured than new patients