esakal | कोरोना संशयितांची मदार खासगी क्वारंटाइन केंद्रांवर 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus quarantine center

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, एकूण रुग्णसंख्या सात हजारांच्या टप्प्यात आहे. १०-१५ दिवसांपासून नव्या बाधितांचा आकडा रोज दोनशेवर जातो. गुरुवारी दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. रुग्णवाढीसोबत त्यांच्या संपर्कातील संशयितही वाढत आहेत.

कोरोना संशयितांची मदार खासगी क्वारंटाइन केंद्रांवर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णही वाढताहेत. परिणामी, शासकीय क्वारंटाइन केंद्रेही ‘फुल’ झाली. आता काही सामाजिक, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत संशयित रुग्णांसाठी सशुल्क खासगी क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहेत. शहरातील तीन-चार केंद्रांवर तीनशेवर बेडची सर्वसुविधांयुक्त व्यवस्था असून, त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, एकूण रुग्णसंख्या सात हजारांच्या टप्प्यात आहे. १०-१५ दिवसांपासून नव्या बाधितांचा आकडा रोज दोनशेवर जातो. गुरुवारी दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. रुग्णवाढीसोबत त्यांच्या संपर्कातील संशयितही वाढत आहेत. कुटुंब व संपर्कातील अशा व्यक्तींना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करावे लागते. वाढत्या संख्येमुळे जिल्हा रुग्णालयाचे कोविड कक्ष फुल आहेत. महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात क्वारंटाइन सेंटर व कोविड केअर सेंटर सुरू केले असून, तेही फुल होत आहे. 

संस्थांचा पुढाकार 
काही सेवाभावी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत खासगी क्वारंटाइन सेंटर सुरू केली आहेत. या केंद्रांवर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयितांना दाखल करून घेतले जात आहे. संघटनांनी सुरू केलेल्या कक्षासाठी ठराविक शुल्कही आकारले जात आहे. अर्थात, या सर्व केंद्रांना प्रशासनाने रीतसर परवानगी दिली आहे. या सर्व ठिकाणी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, चहा-नाश्‍ता, भोजनाची व्यवस्था केली जात आहे. 

‘जितो’चे क्वारंटाइन सेंटर 
जैन इंडस्ट्रिअल, ट्रेडर्स ऑर्गनायझेशन अर्थात ‘जितो’ संघटनेने महामार्गालगत मानराज पार्कसमोर खासगी वसतिगृहात ८० बेडचे क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहे. ४० खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन व्यक्तींची व्यवस्था असून, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचाऱ्यांची २४ तासांसाठी शिफ्टनिहाय नियुक्ती केली आहे. सकाळी चहा-नाश्‍ता, आयुर्वेदिक काढा, दोनवेळचे भोजन, पहाटे योगा, प्रत्येक खोलीत मनोरंजनासाठी टीव्ही, पुस्तकांची व्यवस्था आहे. या ठिकाणी दाखल संशयितांची सुरवातीला तसेच रोज वैद्यकीय तपासणी केली जाते. 

भरारी फाउंडेशनचा पुढाकार 
भरारी फाउंडेशननेही प्रशासनाकडे राजेसंभाजी नाट्यगृहातील बाल्कनीच्या हॉलमध्ये ५० बेडचे सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी मागितली असून, ते सोमवार (ता. २०)पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, चहा-नाश्‍ता, भोजनाची व्यवस्था असेल. ही व्यवस्था आणखी वाढवून १०० बेडपर्यंत करण्याचे नियोजन आहे. 

माहेश्‍वरी समाजाकडूनही सेवा 
माहेश्‍वरी समा मंडळाने रिंग रोडवरील महेश प्रगती सभागृहातील २० खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन अशी ४० बेडची व्यवस्था केली आहे. या ठिकाणीही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची नियुक्ती २४ तासांसाठी असून, सकाळी चहा-नाश्‍ता, दुपारी भोजन, सायंकाळी फळे, भोजन व रात्री हळदीचे दूध आदी पुरविण्यात येते. संशयित रुग्णांना श्‍वास घेण्यास अचानक त्रास झाला, अशांना तातडीने ऑक्सिजनची व्यवस्थाही आहे. शिवाय सर्व रुग्णांची दिवसातून तीन वेळा वैद्यकीय तपासणीही केली जाते. 

केमिस्ट संघटनेकडून प्रस्ताव 
केमिस्ट संघटनेलाही केमिस्ट भवन व सरदार पटेल लेवा भवन या दोन ठिकाणी क्वारंटाइन कक्ष सुरू करण्याबाबत परवानगी मिळाली असून, तेही लवकरच सुरू होणार आहे. क्वारंटाइन सेंटरमध्येही दोन्ही वेळचा चहा-नाश्‍ता, भोजनचाी व्यवस्था असेल. दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी २५ अशा ५० बेड असतील. 
 
अनेकदा संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्यास नकार देतात. त्यांच्यासाठी जितो संघटनेने ही व्यवस्था केली असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉक्टर, अन्य स्टाफ रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी २४ तास उपलब्ध असतो. 
-सुमीत मुथा, प्रकल्पप्रमुख 

भरारी फाउंडेशनने संभाजीराजे नाट्यगृहात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी मागितली असून, मिळाल्यानंतर लगेच ते सुरू करण्यात येईल. संशयित रुग्णांसाठी आवश्‍यक सर्व सुविधा, व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. 
-दीपक परदेशी, अध्यक्ष, भरारी फाउंडेशन 

माहेश्‍वरी समाज मंडळाने महेश प्रगती सभागृहात सर्व समाजातील व्यक्तींसाठी क्वारंटाइन कक्ष सुरू केला असून, सर्व प्रकारचे हायजिन, रुग्णांची काळजी, सॅनिटायझेशन, नियमित चहा-नाश्‍ता, सात्त्विक भोजन आदी व्यवस्था देण्यात येत आहेत. 
-यश लढ्ढा, व्यवस्थाप्रमुख 

रग्णसंख्या वाढत असून, संशयित रुग्णही वाढत आहेत. अशा सर्वांना शासकीय रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर व संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष आवश्‍यक त्या सर्व सुविधांसह उपलब्ध करून देत आहोत. 
-सुनील भंगाळे, अध्यक्ष, केमिस्ट संघटना 

loading image