‘कोरोना’ मंदावला पण डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय; जळगावा आहेत इतके रूग्‍ण 

देविदास वाणी
Sunday, 18 October 2020

डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने अद्यापही कोणतही उपाय योजना केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

जळगाव : गेल्या सात महिन्यांपासून कोरोना विरोधात आरोग्य यंत्रणा लढा देत आहे. आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दूसरीकडे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने अद्यापही कोणतही उपाय योजना केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

शहरात सर्वत्र अस्वच्छता वाढली आहे.सोबतच मोकळ्या जागावर गवतही वाढल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे. नगरसेवक अ‍ॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, प्रतीभा पाटील, प्रतीभा देशमुख, शिवसेनेचे प्रशांत नाईक, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांच्याकडून शहरातील मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्येची माहिती घेतली. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे महापालिकेने काही कोविड केअर सेंटर बंद केल्याची माहिती देण्यात आली. 

महापालिकेची रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु करा 
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये काम क रत असलेल्या मनपा वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना आता महापालिका रुग्णालयात आणून, महापालिकेचे रुग्णालये पुर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सूचना नगरसेवकांनी दिल्या. महापालिकेच्या काही रुग्णालयात सध्या ओपीडी सुरु असून, इतर तपासण्या बंद आहेत. आता त्या देखील सुरु करण्याच्या सूचना नगरसेवकांनी दिल्या. 

रुग्णांची माहिती लपवली 
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना महापालिकेने डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येबाबत पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती. नगरसेवकांनी पाहणी केल्यानंतर मनपाने ही माहिती दिली आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना मनपाकडून शहरात अबेटींग, फवारणी असे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच स्थायी समितीने मंजुरी देवूनही डेंग्यूवरील उपाययोजनांसाठी औषधी खरेदी व अतिरीक्त कर्मचारी पुरविण्याचा ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप अ‍ॅड. पोकळे यांनी केला आहे. महापालिकेच्या ढिसाळ कामामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

शहरात काही रुग्णांना डेंग्यूचे लक्षणे आढळून आले आहेत. मात्र, त्यांना डेंग्यू आहे असे अजून निष्पन्न झालेले नाही. मात्र, अकरा डेंग्यू संशंयित रुग्ण शहरात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

-डॉ.राम रावलाणी, वैद्यकीय अधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus ratio down but dengue suspected patient